अहिल्यानगर : राज्यातील विविध जिल्हा बँकांच्या (DCC) निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना येथेही पाहायला मिळत आहे. मात्र, काही स्थानिक नेत्यांमुळे जिल्हा बँकेची राजकीय गणितं थोडी वेगळी आहेत. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात डीसीसी बँकेची तयारी सुरू असून नेत्यांच्या गाठीभेटी देखील होत आहेत. त्यातच, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा केली. मात्र, या भेटीसाठी खासदार निलेश लंकेंना निमंत्रण न दिल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. दुसरीकडे साताऱ्यात शिवेंद्रराजेंनीही भेटीसाठी सुरू केल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्याकडे बैठक झाली. विशेष म्हणजे बैठकीत जिल्ह्यातील पारंपारिक राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे हे देखील एकत्रित आले. मात्र, या बैठकीला अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. याबाबत निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली असून, या बैठकीचे मला निमंत्रण नव्हते. या जिल्ह्याचा मी खासदार आहे, त्यामुळे मला बैठकीला बोलवायला हवे होते, असे लंके यांनी म्हटले. माझ्याही मतदारसंघात आठ तालुके आहेत. सोबतच जिल्हा बँक जर बिनविरोध होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, मात्र या बँकेच्या निवडणुकीवरून वैयक्तिक हेवे-दावे कोणी काढत असेल तर ते योग्य नाही, असे म्हणत निलेश लंके यांनी एकप्रकारे बैठकीला न बोलवल्यावरुन नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या बैठकीला आपल्याला बोलावले नाही, याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणार आहात का? असे विचारले असता बाळासाहेब थोरात हे आमचे नेतेच आहेत, त्यांच्याशी नक्की बोलेल असंही खासदार लंके यांनी सांगितलं.
साताऱ्यात समन्वयासाठी शिवेंद्रराजेंचे प्रयत्न
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसोबत बैठकांचा धडाका सुरू केला असून, मंत्री मकरंद पाटील, रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरू झाली आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जिल्हा बँकेची निवडणूक व्हावी, महायुतीच्या माध्यमातून व्हावी, यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांमध्ये समन्वयाचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मनधरणी करत एकमत घडवून आणण्याची जबाबदारी शिवेंद्रराजे यांच्याकडे दिले आहे. आता, आगामी काळात नेत्यांचा मेळ घालत मंत्री शिवेंद्रराजे भोसले कोणती रणनीती आखणार, याकडे साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
