Manikrao Kokate : शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात. कर्जमाफीतून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर उडवतात, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले होते. तसेच 'भिकारीही एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देत आहोत. तरीही त्याचा गैरवापर केला जातो, असे वादग्रस्त वक्तव्य देखील माणिकराव कोकाटे यांनी याआधी केले होती. माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. तर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांनी तंबी दिली होती. आता माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. मी हुशार किंवा मोठा माणूस नाही, चुका होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या वक्तव्यावर खुलासा केलाय. मी हुशार किंवा मोठा माणूस नाही. सामान्य घरातून आलो आहे. त्यामुळे वागण्या-बोलण्यात चुका होऊ शकतात. मात्र, माझा हेतू प्रामाणिक आहे, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
शेतीमध्ये सरकारी खर्चाने भांडवली गुंतवणूक करण्याबाबत विचार
दरम्यान, शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केल्याशिवाय शेतकरी आता शेती करू शकणार नाही. पैसे नसल्याने शेतकरी कर्ज काढतो आणि कर्जबाजारी होतो. तो सातत्याने अडचणीत आला, की सरकार मदत करत नाही. या परिस्थितीत तो निराश होऊन वेगळा विचार करतो. हे चक्र थांबविण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करणे आवश्यक झाले आहे. सरकारी खर्चाने शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याबाबत विचार सुरू आहे. देशात 50 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. हवामान बदलामुळे शेतीपुढील आव्हाने वाढली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणे, नवीन तंत्रज्ञानाची त्याला माहिती देणे गरजेचे आहे. बदलत्या काळात शेती सुरक्षित कशी होईल, कमी खर्चात चांगल्या दर्जाचे उत्पादन कसे वाढवता येईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा