(Source: ECI | ABP NEWS)
अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात; गुणरत्न सदावर्तेंची उदयनराजेंवर बोचरी टीका
अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात, इतिहास माहिती असावा लागतो, असंच सहज बोलून चालत नाही, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर पलटवार केला आहे.

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल चुकीची वक्तव्य केल्यावरुन संताप व्यक्त होत आहे. त्यातच, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कायदा केला पाहिजे, अशी परखड भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. मात्र, महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर त्यांनी स्त्री शिक्षणाचा इतिहास सांगितला. त्यावरुन, आता वाद निर्माण होत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उदयनराजेंवर टीका केली होती. आता, अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांनी देखील उदयनराजेंनी (Udayanraje) समोर येऊन इतिहास समजावून सांगावा किंवा माफी मागावी, असे मह्टले आहे.
इतिहासाचा दाखला देताना अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात, इतिहास माहिती असावा लागतो, असंच सहज बोलून चालत नाही, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुलेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास आज जगभरातील अनेक देशांतील विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. 'अनुकरण' या शब्दाचा संदर्भ त्यांना माहित आहे का? एकतर तुम्ही समोर या, सगळं नीट समजावून सांगा आणि जर नाही करू शकत, तर तुमही माफी मागितली पाहिजे, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
''सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, महात्मा फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं'', असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे महात्मा फुले वाड्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसेवर टीका
मनसेच्या भूमिकेवर बोलताना पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी संविधानाची भाषा ही हिंदी असल्याचे म्हटले. तसेच, मनसेकडून महाराष्ट्रातील 48 खासदारांचा धिक्कार करणे म्हणजे वैचारिक विकार असणे आहे. जे 48 खासदार मनसेसाठी उभे राहिले नाहीत, त्यांनी संविधानाचा विचार केला असावा. ज्यांनी संविधानाची बाजू घेतली नाही, त्यांना लाथाडले गेले. किती पदाधिकारी आणि नेत्यांची मुलं इंग्रजी शाळांमध्ये शिकतात? हिंदी भाषेत जे बोलतात, ते संविधानाचीच भाषा बोलत आहेत. त्यामुळे, त्यांना कोणी थांबवू शकत नाही, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
अमोल मिटकरींचं नशिब फळफळलं, महाराष्ट्राचे गृहमंत्री होणार; लवकरच नव्या 'भूमिके'त, म्हणाले, आवडेल मला
























