Abu Azmi : समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी मुघल शासक औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर त्यांच्या राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. औरंगजेब (Aurangzeb) हा क्रूर प्रशासक नव्हता, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अबू आझमींवर टीकेची झोड उठली होती. अबू आझमींनी माफी मागावी, अशी मागणी केली जात होती. यानंतर अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार आहेत. दरम्यान, आज (11 मार्च) छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhajinagar) यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त अबू आझमींनी 'एक्स'वर पोस्ट करत छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले आहे.  

अबू आझमी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शहादत दिनी त्यांना विनम्र श्रद्धांजली, असे त्यांनी म्हटले आहे. अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 

नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?

अबू आझमींनी म्हटलं होतं की, चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत अबू आझमींच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. यानंतर आता अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत. 

निलंबनाच्या कारवाईनंतर अबू आझमींची प्रतिक्रिया

विधानसभेतून निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही अबू आझमी यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी कोणत्याही महापुरुषाबद्दल कोणतही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. आम्ही जे काही भाषणं ऐकतो, त्यावरुन मी वक्तव्य केले. यावर वाद तयार करण्याची काय गरज आहे? भाजपचा ज्या मुद्द्यांवरून मतं मिळतात त्याच मुद्द्यांवर वाद निर्माण केले जातात.  महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा द्या, तसा कायदा करा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे या आधीच केली आहे. ज्याची सत्ता असते तो कसाही गुन्हा दाखल करु शकतो. आज त्यांची सत्ता आहे, त्यांनी खुशाल आपल्याला तुरुंगात घालावे. जे इतिहासात सत्य आहे ते बदलता येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. 

आणखी वाचा 

Satish Bhosle: बीडचा 'आका' कराडप्रमाणेच 'खोक्या भाई' करणार मर्जीने सरेंडर करणार? पाच दिवसांपासून फरार, माध्यमांना मुलाखत पण पोलिसांना सापडेना