Abu Azmi on Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack)  तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त करण्यात आला. हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करत जोरदार प्रत्युत्तर दिले. आता यावरून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुळजापूर येथे झालेल्या समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी याबाबत भाष्य केले आहे.     

नेमकं काय म्हणाले अबू आझमी? 

पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत आझमी म्हणाले, "27 निष्पाप लोकांना ठार करण्यात आलं, तरी आजपर्यंत एकही आतंकवादी पकडला गेला नाही. मग देशाचे रक्षण करणारा ‘चौकीदार’ नेमकं काय करतोय? चौकीदार बदलायचा की नाही?" असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. दुनिया एकीकडे खुप प्रगती करत आहे. मात्र, मोदी सरकार मंदिर आणि मस्जिदमध्येच अडकली आहे आणि अमेरीकेसमोर गुडघे टेकवत आहे, असा हल्लाबोल देखील अबू आझमी यांनी केला आहे. आता अबू आझमी यांच्या टीकेवर भाजप काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

अबू आझमींविरोधात वारकरी सामाज आक्रमक

दरम्यान, अबू आझमी यांनी सोलापुरात वारीसंदर्भात (Wari)  एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही, असे आझमी म्हणाले. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळं रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही असे आझमी म्हणाले. दरम्यान, अबू आझमींच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सोलापुरातील वारकरी रस्त्यावर उतरत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अबू आझमी यांच्या 'वारीमुळे रस्ता जाम होतो' या वक्तव्याच्या विरोधात वारकऱ्यांनी टाळ वाजवत निषेध आंदोलन केले आहे. सोलापुरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. अबू आझामी यांनी त्यांचे विधान मागे घेतले नाही तर राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. 

आणखी वाचा 

वारीसंदर्भात अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर