मुंबई : पहिल्या आंदोलनातून (Agitation) धडा घेतलाय, त्यामुळे आज सगळेजण तयारीनिशीच आंदोलनात आले आहेत. तुम्ही लाठ्या-काठ्या हाणा, किंवा तुरुंगात टाका आमचं आंदोलन सुरूच राहणार, असे एका युवतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात बोलताना म्हटले. त्यानंतर, अभिजीत दिपकेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही ऐकताय ना, हे ऐका. आंदोलन केलं तर तुम्ही आम्हाला तीन दिवस तुरुंगात टाकणार होते, या आम्हाला तुरुंगात टाका, जेलमध्ये टाका, असे म्हणत अभिजीत दिपकेंनी (Abhijeet dipke) मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
तुम्हाला काय हे आमदार वाटले का, धमकी दिली की पळत तुमच्याकडे येतील. तुमची खुर्ची म्हणजे फेव्हीकॉलने चिटकवेला एक-एक पाय आहे. त्यामुळे, कधी तुमची खुर्ची पडेल सांगता येणार नाही. महाराष्ट्राला जिजाऊ, सावित्रीबाई, आंबेडकर, शाहू, फुले यांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही विसरले असाल, पण आम्ही विसरत नाहीत. तुम्ही आम्हाल तुरुंगात टाकणार होते का, या टाका जेलमध्ये, तीन दिवस नाही तर तीन महिने आम्हाला जेलमध्ये ठेवा. जेलमधून बाहेर आल्यानंतर मी तीच गोष्ट म्हणेल जे तुम्ही म्हणायचे, मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन... असे म्हणत अभिजीत दिपकेंनी शिवाजी पार्कमधील आंदोलनातून फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, यावेळी आंदोलकांनी गांधी.. गांधी.. गांधी... वंदे मातरम.. वंदे मातरम... इस्तिफा दो.. इस्तिफो दो... अशी घोषणाबाजी करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दिल्लीनंतर आता महाराष्ट्राच्या राजधानीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी, आज महात्मा गांधींच्या जयंतीदिनीच सीजेपीने मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन पुकारले असून मोठ्या संख्येनं तरुणाई आंदोलनात सहभागी होत आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री शर्लिन चोपडाने देखील सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दर्शवला आहे. तर, ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनीही सहभागी होत अभिजीत दिपकेचं कौतुक केलंय.
तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग, सेलिब्रिटीही आले
महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचत्य साधत तर दादर येथील शिवाजी पार्क जवळ CJP कडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला तरुणाई येऊ लागली आहे. याच आंदोलनात गांधीजींच्या वेष परिधान करुन एक तरुण आंदोलनासाठी पोहचला आहे. सीजीपी आंदोलनासाठी तरुणांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आता शिवाजी पार्कच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. केवळ सेना भवनहून दादर स्टेशन, वांद्रेहून सीएसटीकडे जाणारा रस्ता सुरू ठेवण्यात आला आहे. शिवाजी पार्कच्या दिशेने जणारा रस्ता बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. दरम्यान, अभिजीत दिपकेंच्या आजच्या आंदोलनात अभिनेते नसरुद्दीन शाह आणि शर्लिन चोपडा यांनीही सहभागी होत पाठिंबा दिला आहे. यावेळी, नसरुद्दीन शाह यांनी दिपकेंचं कौतुक केले, तर मी आपला मोठा फॅन आहे असे अभिजीत दिपकेंनी यावेळी म्हटले. या आंदोलनात गायक विशाल दललानीनेही सहभागी होत ग्यानू गो... अशी शेरेबाजी केली.
हेही वाचा
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
