Abhijeet Dipke: CJP कडून आज स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) दिवशी ‘स्कूल ठीक करो’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) या अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी संतुक पिंपरी येथे दाखल झाले. ध्वजारोहणानंतर अभिजीत दिपके त्यांच्या गावातील प्राथमिक शाळेत दाखल झाले आणि शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेची झालेली दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आली. राज्यातील अनेक शाळांची अत्यंत दुरवस्था झाली असून, या सर्व शाळा ठीक करणे गरजेचे आहे, अशी भूमिका अभिजीत दिपके यांनी यावेळी मांडली. सेवा मिळत नसल्याने आणि योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याकडून ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यांनी त्यांच्या मूळ गावातील संतुक पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी करून या अभियानाला सुरुवात केली. शाळेच्या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या वर्गातील खिडक्या फुटलेल्या असल्याचे दिसून आले. तसेच शाळेतील शौचालयाचीही अवस्था अत्यंत खराब असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, फुटलेल्या खिडक्यांना झाकण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आल्याचेही यावेळी दिसून आले. या सर्व परिस्थितीवर अभिजीत दिपके यांनी नाराजी व्यक्त केली.
अभिजीत दिपके पत्रकार परिषदेत म्हणाले की, "खिडक्या फुटक्या आहेत, बाथरूम घाण आहे. ग्रामीण भागातील शाळा ठीक केल्या नाही तर विकास होणार नाही. वरच्या स्तरावरून अडचणी आहेत. पुढील आठवड्यात या दुरुस्ती करून पुन्हा एकदा भेटूया. पुढील आठ दिवसात सर्व दुरुस्त्या केल्या जातील, अशी ग्वाही सरपंचांनी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
Abhijeet Dipke: शाळा बंद पडण्याला सरकारचे धोरण जबाबदार
अभिजीत दिपके पुढे म्हणाले की, शिक्षकांना एसआयआर (SIR) साठी कामाला लावलं जात आहे. पैसे वाचवायचे आहेत म्हणून शिक्षकांना कामाला लावलं जात आहे. इतर लोकांना एसआयआरसाठी कामाला लावा आणि शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम लावा. शाळा बंद पडत आहेत, याला सरकारचे धोरण जबाबदार आहे. खासगी शाळांना सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून ही भूमिका घेतली जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका
80 वर्षांनंतरही आपल्या देशातील शाळेत पिण्याचे पाणी नाही. आमदार झाले की त्यांचे बंगले होत आहेत. निवडून आले की तुमचे बंगले बांधता, मग या मुलांचे काय? ग्रामीण भागातील लोक जास्त मतदान करतात, कारण त्यांच्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे. नवीन पीएम हाऊस आणि पार्लमेंट बांधले जात आहे, हे सर्व बंद करा आणि आधी शाळा बांधा. नवीन पीएम हाऊस आणि पार्लमेंटमुळे देशाची प्रगती होत नाही. 80 वर्ष झाल्यानंतरही आपण जातीवादात अडकतो, मग कसला विश्वगुरू? 'बटेंगे तो कटेंगे' यामुळे काय होणार आहे? या भानगडीत पडू नका. शिक्षित होणे म्हणजे चांगला माणूस बनणे होय. जातीवाद संविधानात (कुठेही लिहिलेला नाही, यामुळे देशाचे भले होणार नाही. मागील 40 वर्षांत सर्वात जास्त बेरोजगारी आता होणार आहे, असे देखील अभिजीत दिपके म्हणाले.
आणखी वाचा
