मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या आक्रमक झाले असून मुंबईतील मोकळ्या मैदानांना बिल्डरच्या घशात घालण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याच अनुषंगाने ठाकरेंच्यावतीने मुंबईत तिरंगा झेंड्याखाली मैदान वाचवा असा मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्यानंतर, आज आदित्य ठाकरे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींवरही (Nitin Gadkari) टीका केली.
मुंबई गोवा महामार्गावर पाहणी करताना, हा पूल स्पेस टेक्नॉलॉजीने बांधला आणि काही दिवसातच हा ब्रिज बंद झाला. नॅशनल हायवेच्या लोकांनी ऑडिट केलं, त्यानंतर ब्रिज हा बंद केला. मुंबई गोवा महामार्गावरचा हा ब्रिज आहे, काही ठिकाणी खड्डे आहेत. मागे टनेल आपण बघितला त्या टनेलमध्ये पाणी साचलं आहे, आता मासे तिथे पाहायला मिळतात, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी रस्त्याच्या मु्द्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. दहा वर्षापासून आम्ही ऐकतो की, गणपतीच्या आधी हा रस्ता होणार असे म्हणतात. मात्र, मंत्री येतात पीडब्ल्यूडीचे लोक येतात आणि तरीही रस्ता पूर्ण होत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गावरुन मंत्री महोदयांना लक्ष्य केलं.
काही दिवसांपूर्वी दुबईच्या राजाने मंत्री महोदयांना दुबईचे रस्ते बनवायला बोलवलं असं मी ऐकलं, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी नितीन गडकरींना टोला लगावला. आपण आधीचे अंडरपास पाहिले, ग्रामस्थ एका बाजूने दुसऱ्या बाजूला जातात, लहान मुलं जातात. पण, गुडघ्यापर्यंत त्या टनेलमध्ये पाणी होतं, असे म्हणत नितीन गडकरींवर टीका केली. मुंबई गोवा महामार्गाचे काम करत असताना जर कंत्राटदार इतके वर्ष पळून जात असतील तर तुमच्या खात्याचा आणि मंत्रिपदाचा काय उपयोग? अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी नितीन गडकरींना लक्ष्य केलं. दुबईच्या राजाने जर हे फुटेज बघितलं तर काय होईल माहिती नाही. मात्र, रस्ते बनवताना स्पेस टेक्नॉलॉजी वापरली हे खरंय, असा टोलाही आदित्य यांनी लगावला.
पालकमंत्र्यांचे बॅनर ए1 क्वॉलिटीचे
भरत गोगावले पालकमंत्री झाले म्हणून ब्रिजच्या समोर बॅनर लावले, बॅनरची क्वालिटी A1 आहे, पण पुलाची क्वॉलिटी स्पेस टेक्नॉलॉजीची आहे, असा टोला गोगावलेंना लगावला. एवढा भयानक रस्ता असताना मंत्र्यांनी दौरे करून काहीच उपयोग नाही, बाहेर बघा तरी काय चाललंय. ज्या क्वालिटीचे पालकमंत्र्यांचे पोस्टर लागले आहेत त्या क्वालिटीचे रस्ते कधी बनणार, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. दोन वर्षापासून पालकमंत्री पदावर भांडण सुरू होते, पालकमंत्री पदावर भांडले, गाडीवरून बांधले, बंगल्यावरून भांडले. पण रस्त्यावरून कोणी आवाज उठवला नाही. कारण, हे मंत्र्यांचे भांडण नाही कॉन्ट्रॅक्टरचं भांडण आहे, असे आदित्य यांनी म्हटलं.
एक परीक्षा 'नीट' घेता येईना
नीटचा पेपर फुटला त्याचं केंद्रबिंदू महाराष्ट्र होता, सीईटी परीक्षेचा विषय सुद्धा आला होता, आता एमपीएससीचा पेपर फुटला. तरुण मुलं-मुली जेव्हा रस्त्यावर आले होते, तेव्हा त्यांनी लाठीचार्ज करणारे हे सरकार होतं. दिमागी नक्षल बोलणारे हेच होते, जे एखादी परीक्षा नीट घेऊ शकत नाही, त्यांना वन नेशन वन इलेक्शन करायचं आहे, असे म्हणत पेपरफुटीवरुनही आदित्य यांनी सरकारला लक्ष्य केलं.
