अहिल्यानगर : राज्यात एकीकडे विधानपरिषद निवडणुकांचे (Election) रणशिंग फुंकले असताना, दुसरीकडे जिल्हा बँकांच्या निवडणुकांचीही रणधुमाळी सुरू आहे. सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. त्यात, अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा बँकेसाठी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याकडून उमेदवारी दाखल करण्यात येणार होती. मात्र, तीन अपत्ये असल्याने त्यांची उमेदवारी अपात्र असल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं. आता, त्यावरही राम शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असून आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचेही जाहीर केले.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा व्यक्तिगत कारणामुळे हा निर्णय घेतलेला नसून, घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता जपण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कर्जत-जामखेडमधील कार्यकर्त्यांचं कौतुक करताना, दोन संस्थांच्या माध्यमातून आपला ठराव बिनविरोध झाल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला. तसेच, दोन तालुक्यांत ठराव होण्यावरुन निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक आणि जामखेड तालुक्यातील दिसलेवाडी या दोन संस्थांच्या माध्यमातून आपला ठराव करण्यात आला. हा ठराव बिनविरोध झाल्याचं सांगत त्यांनी कर्जत-जामखेडमधील कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक तयारीचं कौतुक केलं.
राम शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावरुन प्रचंड राजकीय गोंधळ उडाला होता, आरोप - प्रत्यारोप झाले होते, राम शिंदे यांना तीन आपत्य असल्याने त्यांचा अर्ज टिकू शकत नाही, असं त्यांचे राजकीय विरोधक रोहित पवार यांनी देखील म्हटले होते. मात्र, तरी देखील आपण नियमात राहून अर्ज भरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आज अचानक त्यांनी आपण जिल्हा बँकेसाठी उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
2002 नंतर तिसरे अपत्य असल्यास अपात्र
दरम्यान, सहकार कायद्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीला 7 सप्टेंबर 2002 नंतर तिसरे अपत्य जन्माला आले असेल तर ती व्यक्ती सहकारी संस्थेची कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही. सहकाराचा हाच नियम भाजप नेते तथा विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्यासाठी अडसर ठरला.
