Parli Crime News : बीडच्या परळी शहरात गाईंना गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु परिसरातील जागरूक नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणात परळी शहर पोलीस (Beed Police) ठाण्यामध्ये दोन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता.
एबीपी माझाच्या बातमीनंतर या सर्व प्रकाराची माहिती मिळताच राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांना या प्रकाराच्या पाठीमागे असलेल्या लोकांचा शोध घेण्याचे सांगितले होते. याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रय दुनदुले यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गाईंना गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न करणारे नेमके कोण? याचा शोध परळी शहर पोलीस घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्याच्या परळी शहरातील स्नेह नगर भागात मध्यरात्रीनंतर गाईंना वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून गुंगीचे औषध खाऊ घालून त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र हा संतापजनक प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर हे चोरटे पळून गेले. विशेष म्हणजे चोरट्यांचा झायलो आणि अर्टिगा गाडीतून गाई नेण्याचा प्रयत्न असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दरम्यान, चोरीच्या प्रयत्नांची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. कालांतराने ज्या गाईंनी हे पदार्थ खाल्ले होते त्या गाईंना हालचाल देखील करता येत नव्हती. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चोरटे गाडीतून उतरले आणि त्यांनी गाईंना ब्रेड, शेंगदाणे खाऊ घातले. त्यानंतर काहीच वेळात त्या गाई बेशुद्ध पडल्या.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार एबीपी माझा ने लावून धरला होता. अशातच 'माझा'च्या बातमीनंतर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेत बीड पोलीस प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याच्या सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या. त्यानंतर आता या प्रकरणी गाईंना गुंगीचे औषध देणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
