परभणी : राज्यातील सर्वच जिल्ह्यात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता महापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई वगळता ठाण्यासह इतर महापालिकेच्या महापौरपदी निवड निश्चित करण्यात आली आहे. तर, पुणे आणि पिंपरीतही नावं अंतिम झाली आहेत. मात्र, चंद्रपूर आणि परभणी (Parbhani) महापालिकेच्या संख्याबळामुळे सर्वांचे लक्ष या महापालिकेतील निवडीकडे लागले आहे. परभणीत महापौरपदाची (Mayor) निवडणूक होत असताना, सर्वच राजकीय पक्षांनी आपला दावा करत तब्बल 13 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वाधिक जागा असलेल्या उबाठा सेनेच्या (Shivsena UBT) वतीने एकूण सहा जणांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, कमी जागा असतानाही काँग्रेसने महापौर आणि उपमहापौर दोन्ही जागांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला असून उबाठा सेनेचे टेन्शन वाढणार आहे.
परभणीत भाजपनेही महापौरपदासाठी 3 उमेदवार निवडणुकीत उतरवले असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही एकजण उभा केला आहे. त्यामुळे, एकूण 13 जणांनी अर्ज दाखल केल्याने परभणीत महापौर निवडणुकीत खिचडी झाली आहे. शिवसेना उबाठा पक्षाकडून महापौर पदासाठी दिलीपसिंह ठाकूर,श्याम खोबे,सौ प्रतिभा सरोदे,माजू लाला,सय्यद इकबाल,शाबुद्दीन सिद्दिकी या 6 जणांनी तर उपमहापौर पदासाठी श्याम खोबे यांनी अर्ज दाखल केला. तसेच, भाजपकडून महापौरपदासाठी डॉ. केदार खटींग, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी मीनाताई वरपुडकर, रितेश जैन यांचा अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी विश्वजित बुधवंत यांनी अर्ज केलाय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही महापौर पदासाठी अर्जुन सामाले,उपमहापौर पदासाठी नाजेमा बेगम शेख अब्दुल हे 2 उमेदवार दिले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसने ही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देत सावध खेळी केली आहे. काँग्रेसकडून महापौर पदासाठी भगवान वाघमारे,गणेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली असून उपमहापौर पदासाठी गुलमिर खान यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
परभणीत 65 जागांपैकी कुणाकडे किती नगरसेवक?
चंद्रपूर मध्ये जर उबाठाने काँग्रेसला सहकार्य नाही केले तर इथे काँग्रेस उबाठाला सहकार्य करणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या एकूण 65 जागांपैकी संख्याबळ पाहता उबाठा सेना 25 आणि काँग्रेस 12,भाजप 12,अजित पवार राष्ट्रवादी 11 आणि अपक्ष 5 असे संख्याबळ आहे. ज्यात उबाठा आणि काँग्रेस एकत्र लढल्याने महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर हा काँग्रेसचा होईल असे वाटत असताना काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीने उमेदवार उभे केल्याने उबाठाचे टेन्शन वाढले असून येत्या 9 फेब्रुवारीला पर्यंत डोळ्यात तेल घालून नगरसेवक सांभाळावे लागणार आहेत.
हेही वाचा
छत्रपती संभाजनगरमध्ये एमआयएमचा महापौर? इम्तियाज जलील यांचा दावा; म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकतं