मुंबई : परभणीतील (Parbhani) सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडमधील संरपंच संतोष देशमुख प्रकरणाने यंदाचं हिवाळी अधिवेशन गाजत असताना विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तरे देत आहेत. अद्यापही महायुती सरकारचे खातेवाटप झाले नसल्याने सर्वच प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तरं देत असून बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलंय. बीड हत्याप्रकरणात पोलिसांचीही कुचराई दिसत असल्याचं सांगत बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच परभणीतील हत्याप्रकरणावर भाष्य करताना सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण झाली असून त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होता, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. त्यावरुन, आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आक्रमक झाले असून त्यांना सोमवंशी यांचा शववच्छिदेन अहवालच सोशल मीडियातून शेअर केला आहे.
सोमनाथ सुर्यवंशी हे कायद्याचं शिक्षण घेत होते. त्यांना जाळपोळीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना कोठडीत मारहाण झालेली नाही. त्यांना श्वसनाचा आजार होता असं अहवालात नमूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. त्यानंतर, आव्हाड यांनी शवविच्छेदन अहवाल शेअर करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वासोच्छवासाचा त्रास होता हा जावईशोध कुठून लागला, असाही सवाल त्यांनी विचारला आहे.
मी सोमनाथ सुर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा अहवाल सोबत जोडत आहे. SHOCK FOLLOWING MULTIPAL INJURIES असे स्पष्ट शब्दात सोमनाथच्या मृत्युचे कारण लिहिले आहे. व्याकरणातून विचार केला तर जखमांमुळे धक्का बसून सोमनाथचा मृत्यू झाला आहे, असा त्याचा अर्थ निघतो. या जुन्या जखमा आहेत, असे म्हणणे योग्य होईल का? सोमनाथच्या शरीरावर जुन्या जखमा आहेत, असे कुठेही शवविच्छेदन अहवालात म्हटलेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालाच्या पहिल्याच पानावर SHOCK FOLLOWING MULTIPAL INJURIES असे म्हटलेले आहे. लपवा -छपवीचे हे उद्योग एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एका मुलासोबत का केले जात आहेत? त्याला श्वासोच्छ्वासाचा त्रास होता; त्याची काही औषधे, काही क्लिनीकल रिपोर्ट्स, त्याच्या डाॅक्टरांचे अहवाल तपासलेत का? असे सवाल आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.
सोमनाथच्या घरचे तर हे सर्व नाकारत आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता, हे त्याचे कुटुंबीय सांगताहेत. मग, त्याला पूर्वीपासून श्वासोच्छ्वासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? श्वासोच्छ्वासाचा त्रास होता तर तो जेलमध्ये कुठे तडफडताना दिसला का? त्याला मृत म्हणूनच रूग्णालयात आणले आणि रूग्णालयानेही त्याला आणल्यानंतर तत्काळ मृत म्हणूनच घोषित केले. मग, पोस्टमार्टेम अहवालात ज्या जखमांचा उल्लेख केला आहे. त्या जखमा त्याला झाल्या कधी? त्याच्या शरीरावर किती जखमा होत्या? या मोठ्या अन् गंभीर प्रकरणाची अतिशय सोप्या पद्धतीने विल्हेवाट लावणे म्हणजे आपल्या मानवी संवेदना संपल्या आहेत, असेच बोलण्यासारखे आहे. जर त्याच्या मृत्युचे कारणच समजणार नसेल तर माझ्या मते, अदृश्य शक्तींनी सोमनाथला मारहाण केली. त्या मारहाणीच्या जखमादेखील होऊ दिल्या नाहीत आणि त्यातच श्वास कोंडून त्याचे निधन झाले, असे म्हणायला हरकत नाही. कारणेच शोधायची झाली तर हे कारणदेखील होतं. न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
बीड प्रकरणानंतर वाल्मिक कराडवर गंभीर आरोप
बीडमध्ये शेवटपर्यंत कळले नाही की, वाल्मिक कराडवर कोणता गुन्हा दाखल होणार आहे. तो 302 चा आरोपी होणार आहे की नाही? त्याला मोक्का लागणार आहे की नाही? वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करतेय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहे आणि तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करत आहात. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचा काही संबंध नाही, मुख्यमंत्र्यांना असे म्हणायचे आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. वाल्मिक कराड हा सिरीयल किलर आहे, तो विकृत आहे. तुम्ही म्हणता मी कोणालाही मोकळं सोडणार नाही. तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं. तुम्ही सांगितलं का, आम्ही त्याला 302 चा आरोपी करणार आहोत. ज्या खंडणीतूनही हत्या झाली ती खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे. जर वाल्मीक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचे काम कशासाठी करत आहात? असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.
हेही वाचा
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली