परभणी : सध्या असंख्य प्रकारचे ऑनलाइन गेम, रमी, लुडो अशा गेमच्या विळख्यात तरुणाई सापडल्याचं चित्र आहे. या गेमच्या नादात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी एक एक रुपया जमा केलेल्याचे भानही राहत नाही जीवाची पर्वाही राहत नाही. परभणीच्या रायपुर गावातील 22 वर्षीय तरुणाने ऑनलाइन रम्मी खेळण्याच्या नादात कुटुंबांचे लाखो रुपये गमावले. शेवटी भीतीपायी उंदीर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्या केली.

मोलमजुरी करून खाणाऱ्या चव्हाण कुटुंबीयांवर आर्थिक संकटाबरोबरच एकुलता एक मुलगा गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. य त्यामुळे ऑनलाईन गेमवर बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Parbhani Online Game :आई-वडील मोलमजुरी करणारे

परभणीच्या रायपूर या गावातील मुंजाजी चव्हाण यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा राम, मुलगी राधिका असे चार सदस्य. मुंजाजी आणि त्यांची पत्नी मंदा हे मोलमजुरीचे काम करतात. दोन्ही मुलांनी चांगले शिक्षण घेवून मोठे व्हावे असे आई वडिलांचे स्वप्न. त्याच अनुषंगाने दोघांनाही शिकवले. सध्या राम बी कॉम तृतीय वर्षात तर मुलगी राधिका बी कॉम द्वितीय वर्षात शिकते.

Online Rummy Addiction : मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवले होते

आईने राम आणि तिचे जॉइंट खाते काढून आयुष्यभराची कमाई बँकेत टाकली. शिक्षण सुरू असतानाच रामला मोबाईलवरील ऑनलाईन रमी खेळण्याचा नाद लागला. यातूनच सुरुवातीला थोडे थोडे करत रामने आई वडिलांनी कष्ट करून मुलीच्या लग्नासाठी जमवलेले जवळपास 3 ते 4 लाख रुपये गमावले.

Online Game News : आई-वडिलांकडून मुलाला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न

आता ही बाब घरच्यांना कळेल, पैसे गमावल्यानंतर बहिणीचे लग्न कसे होईल, आई वडील काय म्हणतील या चिंतेत तो पडला. त्यातूनच त्याने विषारी औषध प्राशन केले. आई वडिलांनी कर्ज काढून आपला एकुलता एक मुलगा वाचवा यासाठी परभणीपासून ते संभाजीनगरपर्यंत चांगल्या रुग्णालयात उपचार केले. मात्र ते कामी आले नाहीत आणि रामचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या या ऑनलाईन रमी आणि इतर खेळांवर बंदी आण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Online Gaming Maharashtra : ऑनलाईन गेमवर बंदी आणा

या घटनेला आता जवळपास सहा महिने होत आहेत. मात्र पुत्र विरहाने रामच्या आईच्या डोळ्यातील अश्रू हे एक दिवसही ढळले नाहीत. माझा मुलगा तर गेला, मात्र इतर कुणाचे मूल यात फसून जाऊ नये म्हणून यावर बंदी घालावी अशी कळकळीची विनती त्यांनी सरकारकडे केली आहे.

ग्रामीण भागामध्ये तरुणांना ऑनलाइन रमी आणि इतर तत्सम गेमचे इतके व्यसन लागलेले आहे की यामध्ये तरुण पिढी अक्षरशः बरबाद होत आहे. त्यांच्याबरोबरच कुटुंबावर आर्थिक संकटही कोसळते. त्यामुळे सरकारने या गेम वर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. ही सर्व सरकारची जबाबदारी असल्याचेही गावकरी म्हणत आहेत.

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणावर कर मिळतोय आणि यामुळेच ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन रमी असेल किंवा इतर गेमचं जाळ हे वाढत चाललंय. परंतु या ऑनलाइन गेमच्या नादात महाराष्ट्रातील तरुणाई आणि त्यांचे कुटंब मात्र देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे कुठेतरी या गेम्स वर बंदी आणणे ही काळाची गरज बनली आहे.

ही बातमी वाचा: