Parbhani Accident News : परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात आजी, आजोबांसह नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. कोक–पिंपरी फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे शेवडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Continues below advertisement

जिंतूरच्या शेवडी गावातील भगवान बळीराम काळे, सुशिलाबाई भगवान काळे आणि त्यांचा नातू शिवम काळे हे कवडगाव येथे एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहून दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी कोक–पिंपरी फाट्याजवळ जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरपरभणी एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर भगवान काळे हे दुचाकीसह एसटी बसखाली अडकल्याने घटनास्थळी अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघातानंतर एसटी बस चालकाने थेट बोरी पोलीस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.एकाच कुटुंबातील आजी, आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याने शेवडी गावावर शोककळा पसरली असून काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बारामती तालुक्यातील निरा–मोरगाव राज्य मार्गावर भीषण अपघात, दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू

बारामती तालुक्यातील निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे सायंकाळी भीषण अपघात झाला आहे. या पघातात दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांच्यासोबत असलेला नऊ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारच्या सुमारास चौधरवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक स्कुटी आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेल्याने दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढली. या अपघातात अक्षदा ज्ञानेश्वर बोडरे (वय 17) आणि सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय 15)  यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय 9) हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.

Continues below advertisement