Padma Shri Award ShriRang Lad : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्रीरंग उर्फ दादा लाड (ShriRang Lad) यांना कापूस संशोधनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारकडून 2026 चा पद्मश्री पुरस्कारजाहीर झाला आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कापसाच्या उत्पादनवाढीसाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले. त्यांच्या संशोधनातून विकसित झालेल्या कापसाच्या वाणांमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. याच कार्यामुळे ते शेतकरी वर्गात कृषी ऋषी म्हणून ओळखले जातात. या पुरस्कारामुळं तंत्रज्ञानाची माहिती लोकांपर्यंत जाईल आणि लोकांना त्याचा फायदा होईल याचा पुरस्कारापेक्षा अधिक आनंद असल्याचे मत  दादा लाड यांनी व्यक्त केले. 

Continues below advertisement

कापूस पिकातील उत्पादकता घटवणाऱ्या गळफांदी सखोल अभ्यास

दादा लाड यांचा शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण आणि घनिष्ठ संपर्क तसेच राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झालेले शेतकरी आहेत. दादा लाड यांचे कापूस तंत्रज्ञान हे त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. सन 2002-03 पासून शेतकरी-आधारित संशोधनातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता घटवणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास केला. त्यातून या फांद्यांची प्रारंभीच छाटणी करण्याची प्रभावी आणि शास्त्रीय पद्धत त्यांनी विकसित केली. शेंडा खुडणी, अती घन लागवड, ठिबक सिंचन आणि आच्छादन (मल्चिंग) या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले. या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो, बोंडांचे वजन अधिक होते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक कालावधी घटतो आणि शेतकऱ्यांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढतो.

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील भरीव योगदान

श्रीरंग उर्फ दादा लाड हे परभणी जिल्ह्यातील जिंतूर–देठणा भागातील प्रतिष्ठित शेतकरी असून भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र–गोवा प्रदेश संघटक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. कापूस उत्पादन तंत्रज्ञानाबरोबरच त्यांनी पशुसंवर्धन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी देशी लाल कांधारी गायीच्या संवर्धनासाठी व्यापक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळं मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी कापूस शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने जिंतूर तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान म्हणजे ग्रामीण भागातील मेहनती शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?