परभणी : विकासकामात अडथळा आणला तर ती व्यक्ती आमच्या घरची असो की राष्ट्रवादीची त्यांच्यावर कारवाईसाठी आम्ही पोलिसांना सांगतो, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. याच वक्तव्याचा आधार घेत परभणीतील एका भाजप आमदाराने आता थेट अजित पवारांना पुरावे देत कारवाई करणार का असा सवाल विचारला आहे.


परभणीच्या जिंतूरमधील भाजप आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचं पोस्टर आणि दुसऱ्या फोटोत जिंतूर विधानसभा मतदारसंघातील 1 कोटी 26 लाख रुपयांची कामं रद्द केल्याचा थेट राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहीचा आदेश त्यांनी ट्विट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अडथळे निर्माण करत असून त्यांच्यावर पोलिसी कारवाई करणार का असा सवाल त्यांनी विचारला. हे माजी आमदार म्हणजे विजय भांबळे आहेत.


आदरणीय अजित दादा, विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निधी मिळण्यास विरोध करणं, मिळालेला निधी रद्द करणं हे विकासकामात अडथळे नाहीत का? पुरावे दिलेत. जिंतूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार हे सगळं करतात. याची भाषणांतून जाहीर कबुलीही देतात. त्यांच्यावर करणार का पोलिसी कारवाई? असं मेघना साकोरे यांनी ट्वीट केलं आहे. 






त्यामुळे आपल्या आपल्या स्पष्ट बोली आणि वागण्याने राज्यात प्रसिद्ध असलेले राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार आता काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.


भांबळे-बोर्डीकर राजकीय वैर राज्यात परिचित 
परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि भाजप नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यातील राजकीय वैर हे राज्यात परिचित आहे. दोघांमधली विधानसभेची निवडणूक असो की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक फार अटीतटीची निवडणूक होते. अनेक वेळा हे दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारीच्या घटना घडत असतात. मागच्या विधानसभेला रामप्रसाद बोर्डीकर यांनी स्वतः न लढता त्यांची कन्या मेघना साकोरे यांना निवडणुकीत उभे केले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांचा पराभव केला. यानंतर या दोन राजकीय नेत्यांमध्ये मतदारसंघातील कामावरुन एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. आता तर सरकार महविकास आघाडीचे असल्याने शिवाय विजय भांबळे यांचे अजित पवार यांच्याशी असलेले सख्य यातून ते वारंवार बोर्डीकरांना शह देण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच सामजिक न्याय विभागाचा मंजूर झालेला 1 कोटी 26 लाखांचा निधी रद्द केल्याचा आरोप भाजप आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केला आहे आणि थेट अजित दादांनाच कारवाई करणार का असा सवाल विचारला आहे.