Ajit Pawar : माझा पदाधिकारी स्वच्छ अन निर्व्यसनी असला पाहिजे, दोन नंबरवाला असला की टायरमध्ये गेलाच समजा: अजित पवार
Parbhani NCP Meeting : राज्यातील महायुती सरकार हे सक्षम असून विकास करण्यात कुठेही कमी पडणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं.

परभणी : आपल्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या वागण्या-बोलण्यावरुन त्यांना नेहमीच सूचना देणाऱ्या अजितदादांनी आताही पदाधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतल्याचं दिसतंय. माझा पदाधिकारी हा स्वच्छ आणि निर्व्यसनी असायला हवा, दोन नंबरवाला असेल तर तो टायरमध्ये गेलाच समजा असा सज्जड दम अजितदादांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. परभणीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात अजितदादांनी हे वक्तव्य केलं. यावेळी अजित पवारांच्या उपस्थितीत 400 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला.
राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार शनिवारी परभणी दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रशासनाच्या बैठका घेतल्यानंतर शहरातील अक्षता मंगल कार्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये विविध पक्षांच्या जवळपास 400 पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना अजितदादांनी पक्षाचा पदाधिकारी हा स्वच्छ व निर्व्यसनी असला पाहिजे असं म्हटलं. जर दोन नंबरवाला असेल तर त्याला मी सोडणार नाही, मग तो टायरमध्ये गेलाच म्हणून समजा असा दम भरला.
राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम
यावेळी अजित पवारांनी राज्याचे आर्थिक गणित सांगत किती कोटी येतात आणि खर्च कोटींचा होतो हे सांगून टाकले. राज्यातील महायुती सरकार हे सक्षम असून विकास करण्यात कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. या मेळाव्याला मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांचा ताफा अडवला
एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला,असा आरोप करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परभणी दौऱ्यात किसान सभा आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा येत असताना अचानक आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
कार्यकर्त्यांनी सोबत आणलेल्या चुन्याच्या डब्या अजित पवारांच्या वाहनांच्या ताब्यावर फेकत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांना ताब्यात घेत पोलिसांनी अजित पवारांच्या ताफ्याला मार्ग करून दिला.
ही बातमी वाचा:






















