Pandharpur Vitthal Rukmini Mandir : देशभरातील विठ्ठल भक्तांसाठी एक खुशखबर पुढे आली आहे. यंदा आषाढीला टोकन दर्शनाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. आषाढी सारख्या यात्रा कालावधीतही विठुरायाचे केवळ दोन तासात दर्शन देणाऱ्या टोकन दर्शन व्यवस्थेची प्रायोगिक चाचणी यंदाच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. यामुळे आता तीस तीस तास रांगेत उभारणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, टीसीएस कंपनीच्या मदतीने हे संपूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलप केले असून गोपाळपूरपासून विठ्ठल मंदिरापर्यंत स्कायवॉक उभारला जाणार आहे. याची निविदाही प्रसिद्ध झाली असून पुढील दोन वर्षात हे काम परिपूर्ण होणार आहे. दरम्यान, या टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी या आषाढी एकादशीला होणार आहे. यासाठी तुकाराम भवन आणि सात मजली दर्शन मंडपाचा वापर केला जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे. या चाचणी प्रयोगानंतर विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेत कमालीचा बदल होणार असून आता भाविकांना कितीही गर्दी असली तरी टोकन घेऊन केवळ दोन तासात दर्शन शक्य होणार आहे.
लांबच लांब दर्शन रांग भविष्यात इतिहास जमा होणार- औसेकर
यामुळे दोन दोन दिवस दर्शन रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नसून भाविकांना ज्या दिवशीचे टोकन असेल त्या दिवशी त्यावेळी हे टोकन दाखवून रांगेत सोडले जाणार आहे. स्काय वॉक आणि दर्शन मंडप पूर्ण होण्यास जरी वेळ असला तरी भाविकांना तोपर्यंत तुकाराम भवन आणि सात मजली संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून सोडण्याचा विचार मंदिर समिती करीत असल्याचे औसेकर यांनी सांगितले. यामुळे आता विठ्ठलाची लांबच लांब दर्शन रांग भविष्यात इतिहास जमा होणार आहे.
चैत्री एकादशीला विठुरायाला दाखवला पुरणपोळीचा महानैवेद्य
विठ्ठलाला एकादशी प्रिय मानली जाते. एकादशी दिवशी भक्तांचा उपवासही असतो. पंढरपुरातही विठ्ठललाला प्रत्येक एकादशी दिवशी उपवासाचा नैवेद्य असतो, मात्र याला अपवाद असते चैत्री एकादशी. अशातच आज लाखो विठ्ठल भक्त एकादशी निमित्त प्रथेप्रमाणे उपवास करतात. मात्र विठुरायाला मात्र आज पुरणपोळी सह पंच पक्वान्नाचा महानैवेद्य दाखविला जातो. यामागे एक विशिष्ट परंपरा आहे आणि ती शेकडो वर्षापासून विठ्ठल मंदिरात पाळली जाते.
अशी आहे वारकरी संप्रदायात मान्यता
चैत्र एकादशीच्या दिवशी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचा विवाह सोहळा असतो. या विवाह सोहळ्यासाठी विठुराया आज उपवासाच्या ऐवजी महादेवाच्या विवाहानिमित्त पंचपक्वान्नाचे भोजन घेतात अशी वारकरी संप्रदायात मान्यता आहे. याशिवाय विजय नगर चा राजा कृष्णदेवराय विठ्ठल दर्शनासाठी आला असता तो देवाचे रूप पाहून आपले देहभान हरपून गेला. आणि त्याने विजय नगर येथे विठुरायासाठी भव्य मंदिर बांधत त्या मंदिरात पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती नेऊन त्याची स्थापना केली. विठ्ठल मंदिरातून विठ्ठल विजय नगरला गेल्याने भाविक दुःखी झाले आणि त्यांनी एकनाथ महाराज यांचे आजोबा भानुदास महाराज यांच्याकडे देवाला परत आणण्याचे साकडे घातले.
चैत्र एकादशीलाच पुरणपोळी सह पंच पक्वान्नाचा महानैवद्य
भानुदास महाराज विजयनगरला पोहोचले आणि विठुरायाला घेऊन परत येऊ लागले असताना त्यांना राजाच्या सैनिकांनी अडवले आणि सुळावर देण्याचे आदेश दिले. मात्र विठुरायाने या सुळाचे पाणी केले आणि यानंतर राजाला आपली चूक उमगली व त्याने भानुदास महाराजांसोबत विठ्ठलाला पुन्हा पंढरपूरला पाठवल अशी आख्यायिका आहे. विठुराया परत पंढरपूरला आल्याचा उत्सव म्हणून चैत्री एकादशी दिवशी भाविक स्वतः उपास करत असले तरी देव परत आला म्हणून देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा रूढ झाली आहे. आणि यामुळेच वर्षातील 23 एकादशी दिवशी देवाला उपवासाचा नैवेद्य असतो. मात्र चैत्र एकादशीलाच पुरणपोळी सह पंच पक्वान्नाचा महानैवद्य दाखविला जातो.
हे ही वाचा