सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी (Vittal Rukmini) राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवस कार्यक्रमात घेतलेली दर्शन मंडप स्काय वॉकची रद्द झालेली निविदा आज अखेर पुन्हा प्रकाशित केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही निविदा पुन्हा प्रकाशित केली आहे. राज्याच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा कोण? अशा शब्दात एबीपी माझाने या रद्द निविदेचे वाभाडे बाहेर काढल्यावर शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. आज अखेर ही निविदा पुन्हा प्रकाशित झाल्याने या वादावर आता पडदा पडला आहे.
राज्याचे दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी लाखो भाविकांचे दर्शन सुलभ होण्यासाठी हा प्रकल्प मंजूर केला होता. याला राज्याच्या प्रशासकीय शिखर समिती आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अंतिम समितीने देखील मंजुरी दिल्यावर पहिली निविदा निघाली होती. मात्र असे असतानाही प्रसिद्ध झालेली निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक रद्द केल्यामुळे आजी-माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे कोण? असा सवाल केला जात होता. यावर एबीपी माझाने या दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा कोण असा सवाल उपस्थित केला होता. आज अखेर पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाने 103 कोटी 79 लाख रुपयाची ही निविदास प्रसिद्ध केल्याने लाखो विठ्ठल भक्तांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही यापूर्वी प्रसिद्ध झालेली निविदा कोणाच्या सांगण्यावरून रद्द झाली, याची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदायातून होत आहे.
नेमका काय आहे दर्शन मंडप व स्काय वॉक प्रकल्प?
तिरुपतीच्या धर्तीवर तीस-तीस तास दर्शन रांगेत उभारणाऱ्या विठ्ठल भक्तांना टोकन देऊन केवळ दोन तासात दर्शन घडावे, यासाठी गोपाळपूर परिसरात एक भव्य दर्शन मंडप उभारून तेथून थेट विठ्ठल मंदिरात स्काय वाक बांधण्याचा हा प्रकल्प आहे. विठ्ठल दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तिरुपतीप्रमाणे टोकन देऊन त्यांच्या वेळेनुसार या दर्शन मंडपातून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी टीसीएस कंपनीने मोफत सॉफ्टवेअर विठ्ठल मंदिराला उपलब्ध करून दिले आहे.
येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
येत्या आषाढी एकादशीला याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न मंदिर समिती करत असून यासाठी उभारण्यात येणारा दर्शन मंडप व स्काय वॉक साठीचे हे टेंडर आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 24 महिन्यांचा कालावधी असून सात एप्रिल रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. यापूर्वी निघालेल्या निविदा जर रद्द झाल्या नसत्या तर आत्तापर्यंत ठेकेदार निश्चित करून कामालाही सुरुवात होऊ शकली असती. एबीपी माझा ने आजी-माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यात मोठे कोण असा सवाल करीत यावर आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक त्रुटी दाखवत पहिली निविदा रद्द केल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा या निविदाल्याने भाविकांसाठी विठुरायाचे दोन तासात दर्शन भविष्यात शक्य होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या