Pandharpur Vitthal Mandir: सध्या विठ्ठल दर्शनासाठी देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असताना तासंतास दर्शन रांगेत न थांबता झटपट दर्शन मिळावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. विठ्ठल मंदिरात पैसे घेऊन दर्शनाला सोडण्याचे प्रकार वारंवार समोर येत असताना काल उत्पात समाजाच्या एका तरुणाने भाविकांकडून अशाच पद्धतीने पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पोलिसांनी चिंतामणी उत्पात याला मुंबई येथील काही भाविकांना झटपट दर्शनासाठी घेऊन जाताना पकडले आहे.
चिंतामणी उत्पात या तरुणाने वसई येथील भाविकांकडून विठ्ठल दर्शनासाठी 11 हजार रुपये घेऊन पाच हजार रुपयाची पावती केल्याचे समोर आले आहे. झटपट विठ्ठल दर्शनासाठी भाविकांकडून 11 हजार रु. घेतल्याप्रकरणी या चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिराच्या उत्तर दरवाजातून या भाविकांना आत घेऊन जात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना संशय आला, अन्...
काल पालघर जिल्ह्यातील बिलाल पाडा येथील कुणाल दीपक घरत हे कुटुंबासह सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी चिंतामणी ऊर्फ मुकुंद मोहन उत्पात याने, मी मंदिरात पुजारी आहे, तुमचे लवकरात लवकर दर्शन घडवून आणतो. त्यासाठी 5 हजार 1 रुपयांची मंदिर समितीची पावती देतो व मला 6 हजार रुपये द्यावे लागतात, असे सांगून 11 हजार रुपये भाविकाकडून घेतले . मंदिराच्या उत्तर दरवाजातून या भाविकांना आत घेऊन जात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना संशय आला आणि त्यांनी चौकशी केली असता देवदर्शन करून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांनी चिंतामणी उत्पात याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. काही दिवसापूर्वी सुरक्षा व्यवस्थेतील एक कर्मचारी पैसे घेऊन दर्शनाला सोडताना आढळून आला होता तर यापूर्वी अशाच काही एजंट ना झटपट दर्शनासाठी पैसे घेऊन सोडण्याचे प्रकार समोर आले होते. सध्या विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असताना रोज शेकडोच्या संख्येने व्हीआयपी दर्शन रांगेतून घुसखोरी करताना दिसत असतात. यावरूनच मुदतबाह्य झालेली ही मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी मराठा महासंघ आणि इतर संघटनांकडून पुढे येऊ लागली आहे.