पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या प्रकृतीस अराम पडावा म्हणून पंढरपूर व मंगळवेढा येथे प्रार्थना केल्या जात आहेत. भालके यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांची पाहणी केली.  शरद पवार यांनी आज 4 वाजताच्या सुमारास रुबी हॉल क्लिनिकमध्ये प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रांट यांच्या ऑफिसमध्ये आले आणि तिथे त्यांनी आमदार भारत भालके यांच्या मुलाची भेट घेतली. हॉस्पिटलकडून एक मेडिकल बुलेटीन जारी करण्यात आले असून त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.


पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर भारत भालके हे कोरोनामुक्त झाले, मात्र त्यांच्या प्रकृतीत पुन्हा अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते. अशातच त्यांना पोस्ट कोविड झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वास्तविक भालके याना शुगर व बीपी हे दोन्ही त्रास असल्याने कोरोना काळात त्यांना काळजी घेणे आवश्यक होते. मात्र गोरगरिबांसाठी ते कायम रस्त्यावर राहिल्याने त्यांच्या कुटुंबियांना काळजी वाटत होती आणि अखेर त्यांना कोरोनाने गाठले.


भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शुक्रवार सकाळपासून पंढरपूरात पसरली. या माहितीस अधिकृत दुजोरा दुपारनंतर पुणे येथे रुबी हॉस्पिटलने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमधून मिळाला. सद्यस्थितीत पुण्याच्या रूग्णालयात भालके यांच्यासमवेत त्यांच्या कुंटुबियांसह राष्ट्रवादीचे माजी आमदार दिपक सांळुखे पाटील आहेत. भालके यांच्यासोबत त्यांचा मुलगा व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भागिरथ भालके, पुतण्या व्यंकट भालके व इतर कुटुंबिय व जवळचे कार्यकर्ते आहेत.

भारत भालके हे थेट जनमानसात रमणारे आणि एकदम बेधडक प्रवृत्तीचे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. लहानातील लहान कार्यकर्ता आणि मतदारही थेट त्यांना फोनवर संपर्क करून बोलू शकत असल्याने ते याच लोकप्रियतेच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. भालके यांच्या कारकिर्दीजी सुरुवात कै. औदुंबर पाटील यांच्या काळात झाली. त्यांनी भालके यांचा बेधडकपणा पाहून या पैलवान गड्याला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक केले. यानंतर अनेक राजकीय उलथापालथ घडत भालके स्वकर्तृत्वावर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष बनले. याच काळात 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि पंढरपूर मंगळवेढा हा नवीन मतदारसंघ तयार झाला. याच मतदारसंघातून भालके यांनी 2009 मध्ये रिडालोसकडून निवडणूक लढवीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा दणदणीत पराभव केला आणि त्यांना जायंट किलर हे नाव पडले.


यानंतर 2014 साली पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक यांचा तिरंगी लढतीत पराभव करीत काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला. यावेळी त्यांनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आणि जेष्ठ आमदार कै. सुधाकरपंत परिचारक याना धोबी पछाड देत विजयाची हॅट्रिक केली. भालकेंचे वैशिष्ठ होते त्यांचे गावरान वक्तृत्व आणि याच जोरावर कोणतेही मोठे नेते नसताना भालके यांनी स्वतःच्या जोरावर तिन्हीवेळा आमदारकी मिळवली. यावेळी त्यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना लाल दिवा मिळाला नाही. अतिशय जिंदादिल, बेधडक आमदार म्हणून परिचित असलेले भारतनाना सध्या मृत्यूशी झुंज देत असून ते या लढाईतही विजयी होऊन पुन्हा परत येतील, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.