Vasai Virar Rain Flood News वसई विरार: वसई-विरार शहरात काल झालेल्या विक्राळ अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. सुरुवातीला गुडघाभर असलेले पाणी काही तासांतच कंबरभर पोहोचले आणि वसई, नालासोपारा व विरारमधील हजारो नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्रीज, अन्नधान्य तसेच घरातील इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो दुचाकी आणि चारचाकी नादुरुस्त झाल्या. दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेकांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. (Vasai Virar Rain Flood)

पूरपरिस्थितीमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली. रिक्षा, एसटी आणि पालिकेची परिवहन सेवा ठप्प झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना बाहेर पडणेही अशक्य झाले. गंभीर आजारी रुग्णांपर्यंत ॲम्बुलन्स पोहोचू शकत नसल्याने काही सेवाभावी संस्थांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले, तर अनेक नागरिकांचे रेस्क्यू करण्यात आले. वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने राजावली, भोयदापाडा, कामण, चिंचोटी, वाघराळपाडा, मधुबन, विरार आदी भागांत बचावकार्य राबवत अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान, 24 तास उलटूनही अनेक भागांत आजही  वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. वीज नसल्याने सोसायट्यांमधील पाण्याचे पंप बंद असून पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहासाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवाही अनेक भागांत बंद असल्याने नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. इन्व्हर्टरची बॅटरी संपल्याने मोबाईल चार्ज करणेही शक्य नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. (Vasai Virar Rain News)

नालासोपारा व वसई परिसरातील काही रेल्वे रुळांवर अद्याप पाणी- (Vasai Virar Local Train Updates)

आजही वसई-विरारमध्ये रेड अलर्ट कायम असून दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कालचे पाणी अद्याप अनेक भागांत ओसरलेले नसल्याने नागरिकांना अजूनही गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे आणखी पाऊस झाल्यास परिस्थिती अधिक भीषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सुरू असली तरी ती अत्यंत संथ गतीने धावत आहे. नालासोपारा व वसई परिसरातील काही रेल्वे रुळांवर अद्याप पाणी साचलेले असल्याने गाड्या सावधगिरीने चालविल्या जात आहेत. परिणामी स्थानकांवर प्रचंड गर्दी असून प्रवाशांना जीव मुठीत धरून दरवाज्यांवर उभे राहून प्रवास करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही वेग कमी करण्यात आला आहे. एकूणच, कालच्या महापुरानंतर आजही वसई-विरार आणि नालासोपारा येथील नागरिकांचे हाल कायम असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रशासनाचं आपत्कालीन यंत्रणा ही कोलमडून पडली  आहे. नागरिकांना आजही अनेक मूलभूत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वसई-विरारमध्ये पुन्हा पावसाचा जोर; सखल भागांतील पाणी कायम- (Vasai Virar Rain Flood News)

वसई-विरारमध्ये मंगळवारी दुपारनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कालपासून सखल भागांमध्ये साचलेले पाणी अद्यापही पूर्णपणे ओसरलेले नाही. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये अजूनही पाणी साचलेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 24 तासांपासून लाईट नाही, इंटरनेट सेवा बंद आहे, मोबाईल फोनला नेटवर्क नाही. दरम्यान, दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांना घाणीच्या पाण्यातून मार्ग काढत ये-जा करावी लागत असून अनेक भागांतील दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद