Vasai-Virar Rain : वसई-विरारमध्ये पाऊस थांबला असला तरी त्याच्या भीषण आठवणी अजूनही ताज्या आहेत. 7 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाले आणि रस्ते पाण्याखाली गेले होते. त्याच वेळी उत्तर प्रदेशातून आलेली 22 वर्षीय कविता दुधनाथ जैस्वाल ही नालासोपारा पूर्वेतील बकरा कंपाउंड, मनीचा पाडा परिसरातील नाल्यात पडली.
परिसरात कमरेएवढं पाणी साचल्याने रुग्णवाहिका तर दूरच, कोणतेही वाहन घटनास्थळी पोहोचू शकत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी चादरीचं तात्पुरतं स्ट्रेचर तयार करून मुसळधार पाऊस आणि पाण्यातून वाट काढत तिला रुग्णालयात पोहोचवलं. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून कविताला मृत घोषित केलं. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी केलेली धडपड आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांनाही आलेलं अपयश मन हेलावून टाकणारं ठरलं. या घटनेने अतिवृष्टीच्या संकटाची भीषणता आणि संकटसमयी नागरिकांनी दाखवलेली माणुसकी अधोरेखित झाली.
वसई विरार नालासोपारा भागात पावसाचा जोर कमी, जनजीवन मात्र अजूनही विस्कळीत
वसई विरार नालासोपारा भागांत पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी जनजीवन मात्र अजूनही विस्कळीत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये अजूनही कंबरेपर्यंत पाणी साचलं आहे. वसई पश्चिमेला असलेल्या अंबाडी रोड परिसरात जवळपास सर्व सोसायटीमध्ये अजूनही पाणी भरलेलं आहे.
काही ठिकाणी गुडघाभर तर काही ठिकाणी कंबरेपर्यंतच्या पाण्यातून लोक वाट काढत कामाला निघाले आहेत. अगदी रुग्णालयात सुद्धा पाणी गेल्याने काही रुग्णांना इतरत्र शिफ्ट केलं आहे. तर, रुग्णालयात पाणी भरलं असल्यामुळे रुग्णसुद्धा येऊ शकत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. रुग्णालयात ॲम्बुलन्स येण्यासाठी सुद्धा पाणी भरल्याने मार्ग नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत असल्याचं सध्याचं चित्र आहे.
अनेक जण कामाला निघालेले असताना या सगळ्या भरलेल्या पाण्यातून पुढे वसईकर मार्गस्थ होत आहेत. अजूनही मोबाईल नेटवर्क नाही अजूनही घरात लाईट नाही त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
