पालघर : वसईमध्ये गुरुवारी घडलेली हत्येची एक हृदयद्रावक घटना (Vasai Minor Girl Death case) आता चक्रावून टाकणाऱ्या वळणावर आली आहे. सात वर्षीय अंजली मिथुन शर्मा या चिमुरडीचा मृत्यू अपघात नसून तिच्या 12 वर्षीय भावानेच हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. किरकोळ वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे यांनी दिली आहे.
ही घटना गुरुवारी 17 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास वसई पूर्व येथील पेल्हार परिसरात घडली. अंजली घरी एकटी होती. तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते, तर तिचा भाऊ बाहेर खेळत होता असे सुरुवातीच्या तपासात सांगण्यात आले होते.
आधी अपघात झाल्याचं सांगितलं
प्राथमिक माहितीनुसार, अंजलीने किचनमधील ओट्यावर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टुलवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टुलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळील भाग किचनच्या पक्कडवर आपटल्यानं गंभीर जखमी झाली. सुरुवातीला ही माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीला वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळिंज रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांनी अदखलपात्र मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
भावानेच बहिणीला कटरने मारले
या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, तसेच तांत्रिक तपासाच्या आधारावर मिरा-भाईंदर वसई-विरार गुन्हे शाखेने तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी अंजलीच्या 12 वर्षीय भावाची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. किरकोळ वादातून चिडून त्याने बहिणीला धागा कापण्याच्या कटरने मारल्याचं सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
या प्रकरणी बालकाने गुन्हा केल्यामुळे त्याच्यावर बालन्याय प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पेल्हार पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा विभाग यांच्यातर्फे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ही घटना केवळ दुर्दैवीच नाही, तर लहान वयात उद्भवणारे तणाव, राग, आणि भावनिक समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित करणारी आहे.
ही बातमी वाचा: