Palghar Rain News: पालघर आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Maharashtra Rain News) शक्यता आहे. सध्या पालघर परिसरात चक्रिय परिस्थिती (Cyclonic Circulation) निर्माण झाली असून मान्सूनही सक्रिय आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम गुजरातच्या काही भागांवरही होत असून, तेथे पुढील 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथा आणि डोंगराळ भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तीन दिवसांपासून झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाला असून जिल्ह्यातील लाखो वीजग्राहक मागील 48 तासांपासून अंधारात आहेत. वादळी वारा आणि पावसाचा फटका बसल्याने जिल्ह्यातील विद्युत वाहिन्या कोलमडून पडले असून शेकडो गावांमधील वीजपुरवठा मागील 48 पेक्षा जास्त असून खंडित झाला आहे. पालघरच्या पालघर डहाणू तलासरी विक्रमगड जव्हार मोखाडा या भागात मागील दोन दिवसांपासून बत्ती गुल झाली असून पावसाळ्याआधी महावितरणने दुरुस्तीची काम न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सूर्या आणि वैतरणा नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली- (Palghar Flood News)
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून सूर्या आणि वैतरणा नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झालं आहे. डहाणू तालुक्यातील उर्से साये येथील कॉलनी पाडा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून येथील सर्व नागरिक आपल घरदार सोडून बाहेर आहेत.
पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस- (Palghar Rain Updates)
पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला असून यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याचा सर्वाधिक फटका पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून आत्ताच ओपन केलेला भात आठवडाभर पाण्याखाली असल्याने रोपांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पेरण्यानंतर रोपणी केलेलं रोप पुराच्या पाण्यासह वाहून गेल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून वेळ गेल्याने दुपार पेरणी देखील करू शकत नसल्याचे सांगत या शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. पालघर जिल्ह्यात शेकडो हेक्टर वरील भातरुपणा पूर्ण झाल्या असतानाच मुसळधार झालेल्या पावसाने हे रोप पुराच्या पाण्यासह वाहून नेल्याने शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.
वसई-विरारमध्ये पावसाची विश्रांती; गाला नगरमध्ये तिसऱ्या दिवशीही पाणी कायम- (Vasai Virar Rain News)
वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी शहरातील बहुतांश भागातील साचलेले पाणी ओसरले आहे. सध्या इतर कोणत्याही भागात पाणी साचलेले नसल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, नालासोपारा पूर्वेतील गाला नगर परिसरात परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. येथे सलग तिसऱ्या दिवशीही रस्त्यावर पाणी साचलेले असून परिसरातील भाजी मार्केटमधील अनेक भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, विद्यार्थी आणि कामावर निघालेल्या नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही तासांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या परिसरात ढगाळ वातावरण असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असून कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही. तसेच, वसई-विरारमधील सर्व शाळा नियमितपणे सुरू असून विद्यार्थ्यांची उपस्थितीही नेहमीप्रमाणे आहे.
