Palghar News: पालघर (Palghar) जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेमधील प्रवास एका तरुणासाठी जीवघेणा ठरता-ठरता थोडक्यात टळला. डहाणूकडे (Dahanu) जाणाऱ्या रेल्वेमधून (Railway) वैतरणा खाडी पुलाजवळून प्रवास करत असताना एक तरुण थेट धावत्या ट्रेनमधून खाडी पात्रात पडल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे या तरुणाचे प्राण वाचले.
उद्यन वांगड असे या तरुणाचे नाव असून तो बोईसर येथील रहिवासी आहे. रात्रीच्या सुमारास उद्यन रेल्नेवे प्रवास करत बोईसरकडे परतत होता. वैतरणा खाडी पुलाजवळ ट्रेन सुरू असतानाच अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट खाडीच्या पाण्यात कोसळला. खोल पाण्यात पडल्याने काही क्षण त्याची जीवघेणी झुंज सुरू होती.
Palghar News: पिलरच्या बांधकामाचा आधार घेतला अन्...
खाडी पात्रात पडताच उद्यनने आपले भान न हरपता खाडीतील पुलाच्या एका पिलरच्या बांधकामाचा आधार घेत स्वतःला सावरले. याच दरम्यान ही घटना लक्षात येताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने बोट घेऊन खाडीमध्ये जाऊन उद्यनपर्यंत पोहोचत त्याला सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत उद्यनला दुखापत झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
Palghar News: स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचला तरुणाचा जीव
दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पुलावरून जाताना प्रवाशांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे. स्थानिकांच्या तत्परतेमुळे एक जीव वाचला असून त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
