Palghar Accident: हसत्या-खेळत्या वऱ्हाडावर काळाची झडप! नवरीच्या घराजवळच 100 प्रवाशांचा आयशर ट्रक अपघातात चक्काचूर; 13 जणांचा करुण अंत, पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
Palghar Accident: एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आनंदाने निघालेल्या 100 हून अधिक वऱ्हाड्यांच्या आयशर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना पालघरमध्ये घडलीय.

Palghar Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरच्या धानीवरी येथे सोमवारी एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आनंदाने निघालेल्या 100 हून अधिक वऱ्हाड्यांच्या आयशर ट्रकला भीषण अपघात (Palghar Accident) झाला. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये ट्रकचा पुरता चक्काचूर झाला असून, आतापर्यंत 13 जणांचा करुण अंत झाला आहे. तर 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा अपघात घडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Palghar Accident: आनंदाच्या सोहळ्याचे क्षणार्धात शोकात रुपांतर
मिळालेल्या माहितीनुसार, हे वऱ्हाड डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून धानीवरी येथील खडकीपाडा भागात एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. आयशर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच 100 हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत होते. गाडीत असणारे सर्व वऱ्हाडी एकमेकांसोबत गप्पा मारत, मजा-मस्करी करत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या गप्पांमध्ये रंगले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद होता. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
Palghar Accident: नवरीच्या घराजवळच भीषण अपघात
वऱ्हाडाचा हा आयशर ट्रक नवरीच्या घराजवळ पोहोचलाच होता, तितक्यात मुंबई वाहिनीवरून अत्यंत वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रक थेट पलटी झाला आणि त्यातील सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. याच दरम्यान एक बाईक देखील या अपघाताच्या कचाट्यात सापडली. हा अपघात एका बाईक, कंटेनर आणि आयशर ट्रक अशा तीन वाहनांमध्ये झालेला भीषण तिहेरी अपघात होता.
Palghar Accident: 13 जणांचा करुण अंत
अपघात झाल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. लहान मुले, महिला आणि पुरुषांच्या किंकाळ्या आणि रडण्याच्या आवाजाने धानीवरी परिसर दणाणून गेला. अपघाताचे भयानक दृश्य पाहून रस्त्याने जाणाऱ्या काही वाहनधारकांनी तातडीने आपली वाहने थांबवली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावाचे कार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तातडीने 'कासा उपजिल्हा रुग्णालय' आणि 'वेदांत हॉस्पिटल' येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार 10 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान हा आकडा 13 वर पोहोचला आहे. काही जखमींची प्रकृती अद्यापही अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Palghar Accident: पाच लाखांची मदत जाहीर
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी रात्री घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे . तर जखमी पूर्ण बरे होईपर्यंत त्यांचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे. शासन मयतांच्या कुटुंबीयांची देखील योग्य काळजी घेणार असल्याची माहिती पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
Palghar Accident: मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे
1. सुरेश रत्ना लाखात
2. पांडू गणपत लाखात
3. काळू गोविंद लाखात
4. सुनील अर्जुन दांडेकर
5. चिमा गोविंद कुरहाडा
6. नमिता विठ्ठल दांडेकर
7. सारिका संतोष लाखात
8. आयुष सिताराम लाखात
9. सागर नामदेव शेंडे
10. वंदना शिवराम वळवी
11. सलोनी शिवराम वळवी
12. अजय अहाडी
13. रियांशी संतोष लाखात
आणखी वाचा
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल






















