Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झालीय. भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचे दिसून येतंय. या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत पाकिस्तान असल्याची माहिती विशेष सूत्रांकडून मिळत आहे. भारताला चिथावणी देण्याचा निष्काळजी प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.
पाकिस्तान या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत असल्याचे कळतंय. हे पाकचं चिथावणी देण्याचे एक निष्काळजी कृत्य असून ही भारताविरुद्ध अत्यंत धोकादायक मोहीम असल्याचं समजतं. विशेष सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून, पाकिस्तानने बेफिकीरपणे नौदलाचे इशारे दिले आहेत. अरबी समुद्रात सराव वाढवला आहे आणि नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. अशा अस्थिर परिस्थितीत ही नियोजित क्षेपणास्त्र चाचणी ही उघड चिथावणी आहे आणि भारतासोबत तणाव वाढवण्याचा एक हताश प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे.
युद्धभयानं कापलेल्या पाकिस्तानला चीनची मदत-
युद्धभयानं कापलेल्या पाकिस्तानला चीन मदत करत आहे. चीन 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार आहे. सध्या भारताकडं 4 हजार 200, तर पाकिस्तानकडे 2 हजार 600 रणगाडे आहेत.
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात-
पहलगाममधल्या पर्यटकांवरच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात आहे, हे तेव्हाच लक्षात आले. आता याचे धडधडीत पुरावेसुद्धा समोर आलेत. हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएच्या प्राथमिक अहवालात मोठा खुलासा समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा हात आहे. या हल्ल्याचा कट थेट पाकिस्तानी लष्कर ए तोयबाच्या मुख्य ऑफिसमध्ये शिजल्याची माहिती समोर येत आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री-
5 फेब्रुवारी 2025 रोजी हमासने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता. या रॅलीला 'काश्मीर सॉलिडॅरिटी अँड हमास ऑपरेशन अल-अक्सा फ्लड कॉन्फरन्स' असे नाव देण्यात आले. पहलगाम हल्ल्याच्या नियोजनात सहभागी असलेले दहशतवादी या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशी माहिती देखील मिळत आहे. या कार्यक्रमात हमासचे प्रतिनिधी डॉ. खालेद अल-कदौमी यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. इतर अनेक पॅलेस्टिनी दहशतवाद्यांसह पाकिस्तान समर्थित जिहादी संघटनांनी त्यात भाग घेतला. यावेळी, व्यासपीठावरून भारताविरुद्ध धमक्या देण्यात आल्या.