Protest : विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आज विद्यापीठात, महाविद्यालयात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बैठकीत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन करण्यात आले आहे. 


मुंबईत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 'काम बंद आंदोलन' पुकारल्याने मुंबईतील आज अनेक महाविद्यालय बंद, विद्यार्थ्यांच्या परीक्षांना या आंदोलनामुळे फटका बसला आहे. मागण्या लेखी स्वरुपात मान्य होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा पवित्रा घेतला आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यालयांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने आज एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले. 


बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र जोपर्यंत मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला आहे.  त्यामुळे आज अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारला आहे. बारावी प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यासोबतच लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने याचा फटका पदवी त्यासोबतच बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू शकतो. 


संप कशासाठी ?


महाराष्ट्रातील अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असून आज मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील भवन महाविद्यालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात महाविद्यालयातील शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. आजपासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडू पाहणाऱ्या निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. आश्वासित प्रगत योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू झाला त्यादरम्यानची फरकाची थकबाकी व 1410 विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करावा, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता द्यावी, 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसह इतरही अनेक मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी आज हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.


एसएनडीटी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आज एकदिवसीय लाक्षणिक संप


महाराष्ट्रातील अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असून आज मुंबईच्या चर्चगेट येथील एसएनडीटी महाविद्यालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप केला . या संपात महाविद्यालयातील महाविद्यालयातील  कर्मचारी सहभागी झाले होते. आज पासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या  प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकार विरोधात  आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे  ठाकरसी महिला विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या महासचिव यशवंत गावडे यांनी सांगितले.


भंडाऱ्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन 


शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी एकदिवसीय आंदोलनात उतरले आहेत. या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. जुनी पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांना घेवून हे आंदोलन करण्यात येत आहे. लिपिक, प्रयोगशाळा कर्मचारी, शिपाई या प्रवर्गाचे कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या दिवसात होत आहेत, त्यामुळे यावर शासनाने तातडीने तोडगा न काढल्यास भविष्यात उग्रस्वरुपाचं आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. परिक्षांवर आंदोलनाचा परिणाम पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.