Nobel Prize In Physics 2023: यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अकादमीने केलेल्या घोषणेनुसार, पियरे अगोस्टिनी (Pierre Agostini), फेरेंक क्राउझ (Ferenc Krausz) आणि अ‍ॅन ल'हुलियर (Anne L’Huillier) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांना पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेचा अभ्यास केल्याबद्दल आणि प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.






का दिला जातो नोबेल पुरस्कार?


वर्षभरात मानवतेसाठी मोलाचं कार्य करणाऱ्यांना नोबेल पुरस्कारांनी गौरविण्यात येतं. हा पुरस्कार अनेक क्षेत्रांमध्ये दिला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.  स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. 


अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या कमाईचा बहुतांश भाग हा नोबेल पुरस्काराच्या फंडसाठी दिला होता. तर पहिल्यांदा नोबेल पुरस्कार हा 1901 मध्ये देण्यात आला होता. दरम्यान 1968 मध्ये सेंट्रल बँक ऑफ स्वीडनने इकॉनॉमिक सायन्सेस हा आणखी एक वर्ग या पुरस्कारांसाठी जोडला. तर जगातला हा सर्वात श्रेष्ठ दर्जाचा पुरस्कार असल्याचं म्हटलं जातं. अनेक दिग्गज व्यक्ती या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 


नोबेल पुरस्कार विजेत्यांना काय मिळतं?


नोबेल पारितोषिक विजेत्यांना या पुरस्कारासोबत इतरही अनेक गोष्टी मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना बक्षीसरुपी इतके पैसे मिळतात की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. यासोबतच त्यांना जगभरात मिळणारी लोकप्रियता तर वेगळीच.


यावेळी नोबेल पारितोषिक जिंकलेल्या सर्व लोकांना 1.1 कोटी स्वीडिश क्रोनर मिळाले आहेत. जर आपण ते डॉलरमध्ये पाहिले तर ही किंमत सुमारे 9.86 डॉलर इतकी आहे. जर भारतीय रुपयांत बोलायचं झालं तर ती किंमत 8 कोटींपेक्षा जास्त होईल. पैशांसोबतच विजेत्यांना प्रमाणपत्र आणि सुवर्णपदकही दिलं जातं.


जर एका वर्गामध्ये एकापेक्षा जास्त विजेते असल्यास, बक्षीस रक्कम ही त्यांच्यामध्ये विभागली जाते. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 10 डिसेंबर रोजी विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.


हेही वाचा:


Nobel Prize Winner 2023: आतापर्यंत किती भारतीयांना मिळाला नोबेल पुरस्कार? पाहा संपूर्ण यादी