नागपूरः सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर नव्याने आरक्षण सोडतची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 जुलै रोजी महाल येथील नगरभवनात ही आरक्षण सोडत निघेल. राज्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली. या आरक्षण सोडतीला मोठे महत्त्व असून 52 प्रभागांपैकी 30 प्रभागासाठी पुन्हा प्रक्रिया करावी लागेल. यासाठी राजकीय समीकरण बदलणार असल्याने याकडे सर्वांच्या नजरा टिकून आहेत.


सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण जाहीर करतानाच निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूकांची घोषणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ओबीसी आरक्षण सोडत तातडीने उरकून पुढील निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी तातडीने पाऊल उचलले आहे.


30 प्रभागात बदतील समीकरणे


महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या 56 जागांमधून ओबीसी महिला व सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागा ठरतील. सध्या 22 प्रभागात महिलांसाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित आहे. त्यामुळे 52 प्रभागातील उर्वरित 30 प्रभागांसाठी पुन्हा लॉटरी काढण्यात येईल. हेच 30  प्रभाग राजकीय समीकरण बदलण्यास कारणीभूत ठरतील. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. ओबीसी आरक्षण ठरल्यानंतर या जागांवर सर्वसाधारण वर्गाची दावेदारी संपुष्टात येईल.


हरकती, सूचनांसाठी चार दिवस


आरक्षण सोडत आणि मतदार यादी जाहीर झाली की त्यावर हरकती व सूचनांसाटी किमान 10 ते 15 दिवसांचा कालावधी दिला जातो. मात्र, न्यायालय व निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मनपाने निवडणूक कार्यक्रमासाठी वेगाने प्रक्रिया करण्याची तयारी सुरु केली. त्यामुळेच ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी काढण्यात येणाऱ्या आरक्षण लॉटरीवर हरकती व सूचनांसाठी केवळ चार दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 30 जुलै ते 2 ऑगस्टच्या दुपारी 3 वाजेपर्यंत आक्षेपकर्त्यास हरकती व सूचना करता येईल. प्रभागातील झोनल कार्यालय व मनपा मुख्यालयातील निवडणूक विभागात त्या करता येतील. तथापि, मागविण्यात येणाऱ्या हरकती व सूचनांवर सुनावणी कधी होईल, याबाबत आयुक्तांनी कुठलीही तारीख जाहीर केलेली नाही. हरकती व सूचना प्राप्त होताच त्या तातडीने निकाली काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.