Nitin Gadkari भंडारा : विद्यार्थीदशेत अनेक वेळा नागपुरवरून भंडाऱ्याला स्कूटरनं येण्याचा योग आला. इथून पुढे लाखनी आणि साकोलीपर्यंत स्कूटरनं जात होतो. त्यावेळी वैनगंगा नदीवरील जुना जो पूल होता, पाऊस आला की तो नेहमी पाण्यात डुबून जायचा. त्यानंतर ट्राफिक बंद व्हायचं आणि काहीवेळा तर हे पाणी भंडारा शहरात शिरायचं, ही मोठी समस्या होती. त्यानंतर मी बांधकाम मंत्री झालो आणि वैनगंगेवर एका मोठ्या पुलाची निर्मिती केली. पण, आज मी केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री झालो आणि जवळपास 735 कोटी रुपयाचा अतिशय आधुनिक असा बायपासची निर्मिती करून तो आज भंडाऱ्याला मिळाला, याबद्दल मनापासून भंडाराकरांचं अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग निर्माण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी करून त्यांच्या विद्यार्थीदशेपासून भंडाऱ्याशी असलेले ऋणानुबंध संबंधाची आठवण करून दिली.
अंभोरा इथं एअरक्राफ्ट प्रमाणेच वॉटर क्राफ्टचा मानस
भंडारा शहराच्या या बायपास महामार्गासह भंडारा ते खापा आणि तुमसर ते बपेरा या राष्ट्रीय महामार्गासह लाखनी जवळील मानेगाव येथे उड्डाणपूल, भंडारा शहरातील नऊ किलोमीटर लांबीचा अत्याधुनिक सिमेंट काँक्रीटचा चार पदरी महामार्ग येत्या दोन वर्षात पूर्ण होईल आणि याच माध्यमातून भंडारा अत्याधुनिक अशा इन्फ्रास्ट्रक्चरसह रोजगार निर्मितीतही पुढाकार घेईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील अंभोरा इथं एअरक्राफ्ट प्रमाणेच वॉटर क्राफ्ट सुरू करण्याचा मानस गडकरींनी व्यक्त केला. भंडारा शहरालगत 15 किलोमीटर लांबीचा 735 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या बायपास महामार्गातच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
....नाहीतर मी तुम्हाला सुधारणार- नितीन गडकरी
भंडारा शहरालगत 15 किलोमीटर लांबीच्या बायपास महामार्गाचं शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. यावेळी वैनगंगा नदीच्या पुलावर असलेल्या या कार्यक्रमाला नितीन गडकरी पोहोचले. त्यावेळी भंडाऱ्याचे एसपी नुरुल हसन यांनी त्यांना सॅल्यूट करत 'जय हिंद सर' म्हटलं. तेवढ्याच तत्परतेनं नितीन गडकरी यांनी एसपी नुरुल हसन यांना नमस्ते म्हटलं. दरम्यान, जिल्ह्यात कडक शिस्तीचा अधिकारी नसेल तर आमदारही सुधारणार नाहीत. भंडाऱ्यातील पोलिस अधीक्षकांना टिकवा, नाहीतर मी तुम्हाला सुधारणार अशी हसत हसत तंबी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदेंचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिली.
हे ही वाचा