Nitesh Rane Slams Uddhav Thackeray: 'सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू निघाला', असं म्हणत मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त खास व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसांत अनेक कलाकार, खेळाडू आणि दिग्गजांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती. विशेष म्हणजे सलमान खानची उपस्थिती लक्षवेधी ठरली. सलमान खानला आरएसएसच्या कार्यक्रमात पाहताच अनेकांनी टीकेची झोड उठवली, तर काहींनी सलमान खानचं कौतुक केलं. या मुद्द्यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले.
सभेत पत्रकाराच्या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, "सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू आहे. उद्धव ठाकरेंना खरंच तपासायची गरज आहे, की ते खरंच हिंदू आहेत की नाही. सलमान खानने सरसंघचालकांच्या कार्यक्रमात किमान उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखली. उद्धव ठाकरे कधी राहुल गांधींच्या समोर, किंवा स्वत:चे वडील बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट बोलण्याची हिंमत दाखवतील का? हे उद्धव ठाकरेंना विचारा", असा घणाघात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेत, "भाषेबद्दल आग्रही राहणे आणि त्यासाठी आंदोलने करणे हा एक आजार आहे", असं वक्तव्य केलं होतं. भागवत यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी यावेळी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. "जेव्हा परराज्यातून येणाऱ्या झुंडी स्थानिक संस्कृतीला थेट नाकारतात. भाषेचा सर्रास अपमान करतात. तेव्हा रोष निर्माण होतो. या गोष्टीला आजार म्हणणे चुकीचे आहे", असं राज ठाकरे म्हणाले. "मुळात स्वत:ला अराजकीय संघटना म्हणवून घेणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत पडायचं कशाला? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
राज ठाकरेंच्या वक्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मंत्री नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली. "मी स्वत: त्या कार्यक्रमात उपस्थित होतो. त्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेच्या विषयावर विचार मांडले. याबाबत ज्यांनी राज ठाकरेंना माहिती दिली, त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांनी आपल्या राष्ट्रीय भाषेवर अभिमान असला पाहिजे. त्या त्या राज्यातील भाषेचं महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं"
"जिथे जातील तिथे लोकांना कळेल अशा भाषेचा मोहन भागवत यांनी वापर केला. त्यांनी बंगळुरूचं उदाहारण दिलं. तिथे त्यांनी भाषणात इंग्रजी भाषेचा वापर केला. राज ठाकरेंनी ट्विट केलं. पण त्यांनी हे ट्विट कधी मदरसा समाजातील मौलवीला केलेला नाही. अजान मराठीत म्हणा, असं कधी ते म्हणाले नाहीत", असं नितेश राणे म्हणाले.
