Buldhana Hair Loss : बुलढाणा केस गळती प्रकरणी नवी माहिती; संशयाची सुई आता रेशनच्या धान्याकडे? केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणी नवी माहिती पुढे आले असून या प्रकरणाचा संबंध आता रेशनच्या धान्याशी जोडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे व तसा संशय ही बळावला आहे.

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून नागरिकांना केस गळती (Buldhana Hair Loss) आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. स्थानिक आरोग्य प्रशासनापासून ते देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन पथक अर्थात ICMR ने या परिसरात येऊन रुग्ण तपासणी करून रुग्णांचे व परिसरातील अनेक नमुने तपासण्यासाठी दिल्ली, भोपाळ व चेन्नई येथे नेले होते. मात्र अनेक दिवस होऊनही केस गळतीच्या कारणांचा शोध लागत नव्हता.
मात्र आता या सर्व प्रकरणाचा अभ्यास करून या रुग्णांच्या रक्तात व केसात 'सेलेनियम' या जड धातूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आल आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिक खाद्य म्हणून जो गहू वापरतात त्या गव्हामध्येही सेलेनियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याची माहिती आहे. आणि या सेलेनियम मुळेच ही केस गळती होत असल्याचा अहवाल समोर आल्याचे बोलले जात आहे. याच अनुषंगाने केंद्राचं एक विशेष पथक गेल्या तीन दिवसापासून खामगाव येथील भारतीय खाद्य निगम च्या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामात तपासणीसाठी आलेल आहे.
भारतीय खाद्य निगमच्या धान्य साठ्याची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी
पुढे आलेल्या माहितीनुसार, या गोदामातील गहू , तांदूळ व इतर धान्याचे नमुने घेऊन व कमालीची गोपनीयता पाळत हे पथक कालच दिल्लीला रवाना झाल आहे. या गोदामातील धान्य उचल ही या पथकाने थांबवली असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्रीय विशेष पथकाकडून या धान्य गोदामातून धान्य हे केस गळती संदर्भात तर नाही नेले ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत मात्र भारतीय खाद्य निगम व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र केस गळतीचा संबंध आता रेशनच्या धान्याची जोडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे व तसा संशय ही बळावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























