NEET Maharashtra Protetst: NEET पेपर घोटाळा आणि पेपर लीकविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात जनक्षोभाचा भडका उडाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी, तरुण आणि राजकीय पक्षांनी महाराष्ट्रात एल्गार केला आहे.
"पेपर नाही, सिस्टीम लीक झाली आहे"
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने अभूतपूर्व आंदोलन झाले. पुण्यात मुसळधार पावसाची पर्वा न करता लाल महाल चौक (शनिवार वाडा) ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी 'तिरंगा पदयात्रा' काढली. पारंपारिक राजकीय घोषणाबाजीऐवजी विद्यार्थ्यांनी रॅप गाणी, विडंबनात्मक बॉलीवूड पोस्टर्स आणि "पेपर नाही, सिस्टीम लीक झाली आहे" अशा उपरोधिक फलकांचा वापर करून सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनात केवळ परीक्षार्थीच नव्हते, तर ज्येष्ठ नागरिक, प्राध्यापक, पालक आणि तृतीयपंथी समुदायानेही प्रत्यक्ष सहभागी होऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्य मांडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
मुंबईत ऐतिहासिक 'तिरंगा मोर्चा'
दुसरीकडे, राजधानी मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेकडून शिवाजी पार्कवर तिरंगा मार्च काढण्यात आला. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरता केवळ राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन हजारो तरुण सहभागी झाले होते. आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन्ही युवा नेत्यांनी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर एकत्र येत व्यासपीठ शेअर केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी "केंद्राकडे लाठ्या आणि अश्रूधूर असतील, पण आमच्या विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रध्वज आहे," अशा शब्दांत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तर अमित ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी केली.
राज्यातील इतर शहरांतही आंदोलनाचा वणवा
दिल्लीतील कारवाईचे पडसाद केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये उमटले आहेत. नागपूरमध्येही विविध विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आणि शिक्षण मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्येही शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत रात्री कॅन्डल मार्च काढून दिल्लीतील जखमी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवेदना व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्येही क्रांती चौकात विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन झाले, ज्याला काँग्रेस, डावे पक्ष आणि AIMIM च्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
