नाशिक : स्वामी समर्थ केंद्र अपहार प्रकरणाच्या वादात आता अंनिसने उडी घेतली आहे. गुरुपीठाकडून अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचा अंनिसचा आरोप असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर गुरुपीठाने सर्व आरोप फेटाळले असून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आम्हीच करतोय असा दावा ही केला आहे
दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ गुरुपीठाच्या विश्वस्त मंडळाने 50 कोटीहून अधिक रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्याने भक्त परिवारात खळबळ उडाली आहे. ही तक्रार ताजी असतानाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही स्वामी समर्थ गुरुपीठाच्या विरोधात कंबर कसली असून गुरुपीठावर कारवाईची मागणी केली आहे. स्वामी समर्थ केंद्राकडून कर्करोगासारखे भयंकर रोग बरे करणे, तीर्थाने त्वचा रोग बरा करणे, पिरॅमिड घरचा डॉक्टर, कुठल्याही दुःखद घटना घडू नये, चोरी होऊ नये यासाठी उपाय, UPSC MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मंत्र अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा दाखला देत अंनिसने कारवाईची मागणी केली आहे.
तर दुसरीकडे त्रंबकेश्वरमधील इतर अतिक्रमण आणि स्वामी समर्थ केंद्राच्या बांधकामाबाबत आवाज उठवणाके तक्रारदार चंद्रकांत पाठक यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आल्याने घरावर दगडफेक झाली असून जीवितास धोका असल्याचा त्यांचा दावा आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वच आरोप स्वामी समर्थ गुरुपीठाने फेटाळून लावले आहेत. ऋषीमुनींच्या परंपरेप्रमाणे कार्य चालते. लोकांची श्रद्धा आहे म्हणून ते येतात, आम्ही तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठं कार्य करत असल्याचा दावा गुरुपीठाने केला आहे, असं स्वामी समर्थ गुरुपीठाचे विश्वस्त चंद्रकांत मोरे यांनी म्हटलं आहे.
कोट्यवधी भक्तांची स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी स्वामी समर्थ गुरुपीठाचा भक्त परिवार दिवसागणिक जोडला जात आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात नेहमीच धूसर रेषा असल्याने त्याला काय मापदंड लावणार असा यंत्रणेला प्रश्न पडला आहे. त्यामुळे भक्तांनीही डोळसपणे श्रद्धा ठेवावी आणि भक्तीचा बाजार मांडला जाणार नाही याचीही गुरुपीठच नाही तर सर्वच देवस्थानांनी काळजी घेण्याची गरज आहे.