Sudhakar Badgujar: नाशिकमधील संजय राऊतांचा राईट हँड, फडणवीसांची भेट अन् पक्षातून हकालपट्टी, कोण आहेत सुधाकर बडगुजर?
Who is Sudhakar Badgujar: ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्ष विरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी केल्याची माहिती दिली होती, त्यानंतर आज बडगुजर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Sudhakar Badgujar Nashik Politics News: ठाकरे गटाच्या शिवसनेचे (UBT Shiv Sena Nashik) उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर नाशिकमधील राजकारण (Nashik Politics News) चांगलंच तापलं होतं. सुधाकर बडगुजर यांनी नाराजी देखील व्यक्त करुन दाखवली होती. त्यानंतर ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्ष विरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी केल्याची माहिती दिली होती, त्यानंतर आज बडगुजर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
भाजप प्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध दर्शवला होता. पण स्थानिक नेत्यांच्या विरोधाला झुगारून बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुधाकर बडगुजर चर्चेत आहेत.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.
तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद
अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले. पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला. 2019 साली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा संधी दिली होती. मात्र, यंदा देखील सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला. सुधाकर बडगुजर हे याआधी नाशिक जिल्हाप्रमुख होते. आता त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
सुधाकर बडगुजर यांची वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत
बडगुजर यांच्यावर काही वादग्रस्त प्रकरणेही आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या प्रकरणात 2023 मध्ये त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली . तसेच, 2023 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि गैरवर्तनाच्या आरोपांखाली तक्रार दाखल केली. गेल्या काही दिवसांपूर्वी, बडगुजर यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, ज्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले. सुधाकर बडगुजर हे नाशिकमधील राजकारणातील प्रभावशाली नेते असून, आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.
बडगुजरांना सलीम कुत्ता प्रकरण भोवलं
1. सलीम कुत्ता हा मुंबई बाँबस्फोटांमधला आरोपी
2. जिल्हाध्यक्ष असताना सुधाकर बडगुजरांची सलीम कुत्तासोबत पार्टी
3. बडगुजरांच्या नातलगाच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्तासोबत पार्टी
4. भाजप आ.नितेश राणे, मंत्री दादा भुसेंकडून चौकशीची मागणी
5. नाशिक गुन्हे शाखेकडून बडगुजर-कुत्ताच्या पार्टीची चौकशी
6. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधात्मक कायद्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
7. बडगुजरांना काही भेट वस्तू दिल्या गेल्याचं चौकशीत निष्पन्न
8. दहशतवाद्यासोबत पार्टी केल्यानं बडगुजरांविरुद्ध एसीबीकडून गुन्हा






















