नाशिक : सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे सगळ्यांनाच पितरांची आठवण झाली आहे. या जगाचा निरोप घेतलेल्या पितरांना मोक्ष मिळावा म्हणून सगळेच कावळ्यांचा धावा करत आहेत. कारण कावळा शिवल्याशिवाय पितरांना मोक्ष मिळत नाही, अशी लोकांची भावना आहे. मात्र लोकांच्या याच भावनेचं भांडवल करत नाशिकमध्ये एका अवलियानं जखमी कावळ्याचा बाजार मांडला आहे.


पितरांच्या नैवेद्याला काकस्पर्श व्हावा, म्हणून नाशिककरांची सुरु असलेली धडपड पाहून कुणालाही हसू येईल. रेशन दुकानावर रॉकेल आल्यानंतरही झुंबड उडत नसेल, तशी गर्दी या कावळ्यासाठी होते.

कावळ्यानं चोच मारल्याशिवाय पितरांना मोक्ष मिळत नाही, असं म्हणतात. नाशिककरांच्या पितरांना मोक्ष देण्याचं पुण्य कमवताना, मांज्यानं जखमी झालेला कावळ्याच्या मालकानं खिसा देखील भरल्याची चर्चा आहे.

पितृपक्ष सुरु असल्यामुळे कावळ्याला किती डिमांड आहे, हे रामकुंडावर फेरफटका मारल्यावर पाहायला मिळतं. लोक अक्षरशः ताटकळत उभे राहिलेले दिसतात. एखाद्या समारंभाची पंगत जेवू शकेल एवढा नैवेद्य काकस्पर्शाच्या प्रतीक्षेत आहे.

फक्त पितृपक्षालाच कावळ्याची आठवण काढणारे आपण, त्यांच्या घटत्या संख्येबद्दल अजिबात विचार करायला तयार नाही. पिंडाला कावळा शिवल्यानं दिवंगत पूर्वजांना मोक्ष मिळतो हा श्रद्धेचा भाग झाला. मात्र कावळ्यांप्रमाणे इतर पक्ष्यांच्या मुळावर घाला घालणारे आपणच आहोत हे विसरुन चालणार नाही.

जर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वेळीच पाऊल उचललं नाही, तर पितरांच्या पिंडाला शिवणारा कावळा फक्त अंकलिपीच्या चित्रातच बघायला मिळेल.