नाशिक : अनेकदा गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर पाकीट चोरीला जाण्याचा किंवा हरवण्याचा प्रकार घडतो. एका लग्नात सहभागी होण्यासाठी गेलेले नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढे यांचं पाकिट गायब झाल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं पाकीट हरवलं, चोरीला गेलं की जिल्हाधिकाऱ्यांकडूनच कुठे गहाळ झालं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा रविवारी (3 जानेवारी) संध्याकाळी नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एका (बालाजी) लॉन्समध्ये थाटामाटात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते. तसंच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या लग्नाला हजेरी लावली होती. तगडा पोलिस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्यानंतर आपल्या खिशात पाकीट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर सूरज मांढरे यांच्यासह पोलिसांनी शोधाशोध केली, मात्र पाकीट काही सापडले नाही.


याबाबत पोलिसांना विचारलं असता ते म्हणाले की, रविवारी दिवसभर बैठका आणि इतर कामं असल्याने जिल्हाधिकाऱ्यांची धावपळ सुरु होती. त्यामुळे पाकीट पडले की ते चोरीला गेलं याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनाही नाही.


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मंगल कार्यालय तसेच लॉन्समध्ये चोरी होण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. आता गर्दीचा फायदा घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या पाकीट चोरांनी लंपास तर केले नाही ना? अशी शंका उपस्थित होते आहे.