Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक विधानपरिषद निवडणुकीमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे. ज्या निवडणुकीवरून रणकंदन माजले होते, त्याच निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. नरेंद्र दराडे यांना अपक्ष गोकुळ गिते यांनी धक्का देत अक्षरशः विजय खेचून आणला आहे, त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. निकालानंतर नरेंद्र दराडे यांची नाराजी लपून राहिली नाही. "आमचा विश्वासघात झाला," असा आरोपही त्यांनी केला. इतकेच नव्हे तर त्यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनीसुद्धा "आमचा विश्वासघात झाला असून केसाने गळा कापला" असं म्हटलं आहे. नाशिकची विधानपरिषद निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये होती. या निवडणुकीमध्ये गोकुळ गिते आणि गणेश गिते यांनी शड्डू ठोकला होता, मात्र गणेश गिते यांनी माघार घेतली होती. गोकुळ गिते यांचा अर्ज कायम असल्याने या निवडणुकीकडे नाशिकसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, आता निवडणुकीनंतर धक्कादायक निकाल हाती लागला आहे. एकतर्फीच गोकुळ गिते यांनी मते घेताना नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का दिला आहे.
कोण आहेत गोकुळ गिते?
गोकुळ गिते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे बंधू आहेत गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळले होते. गोकुळ गीते पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत. स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते.
110 टक्के विश्वासघात, केसाने गळा कापला
दरम्यान, निकालानंतर नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे म्हणाले की, महायुतीमधील घटक पक्षांवर आम्ही ज्या अपेक्षेने विश्वास ठेवला होता, तसे मतदान झाले नाही. 100 टक्के शिवसेनेचा विश्वासघात झाला आहे भाजपची 200 मते आणि शिवसेनेची 170 मते होती. उर्वरित मते महाविकास आघाडी व इतरांची होती. समोरच्या उमेदवाराची आकडेवारी पाहता महायुतीमध्ये दगाफटका झाल्याचे स्पष्ट दिसते. निवडणुकीच्या काळात "मी माघार घेतो, मी तुमच्यासोबत आहे, आम्ही प्रचार करत नाही" असे सांगून केवळ दिशाभूल करण्याचे काम केले गेले आणि शेवटी केसाने गळा कापला गेला, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, छगन भुजबळ किंवा इतर नेत्यांच्या नावाबाबत विचारले असता, त्यांनी वैयक्तिक कोणाचेही नाव घेण्यास नकार दिला. मात्र, महायुतीच्या घटक पक्षांकडून दगाफटका झाल्याचा पुनरुच्चार केला. नाशिक जिल्ह्यात या निवडणुकीच्या संदर्भात जे काही घडले, त्याची सविस्तर माहिती आणि अहवाल ते शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
नाशिक अंतिम निकाल
- नाशिक एकूण मतदान - 618
- अवैध मतदान - 13
- वैध मतदान - 605
- फायनल कोटा - 303
- अपक्ष गोकुळ गीते - 357
- शिवसेना नरेंद्र दराडे - 248
इतर महत्वाच्या बातम्या
