Nashik Truck Driver Strike : नाशिक जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात सोमवारपासून संप पुकारला होता. या संपात सुमारे 1 हजार 500 टँकरचालक उतरले होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) व मराठवाड्यातील (Marathwada) १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा झाला होता. या पार्श्वभूमीवर आज मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला असून वाहतूकदारांनी काम करण्यास मान्य केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मिटला आहे. 


आज मनमाड मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधिक्षक शहाजी उमप, प्रकल्प अधिकारी, आरटीओ, पोलीस प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. कालपासून प्रशासनासोबत झालेल्या तीन बैठका निष्फळ ठरल्या होत्या. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे आता नाशिक, उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) व मराठवाड्यातील (Marathwada) १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा पूर्ववत होईल.


वाहतूकदारांच्या समस्या केंद्राला कळवणार


यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, वाहन चालक आणि वाहतूकदार यांच्यासोबत चर्चा केली आहे. वाहन चालक संपकऱ्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले. त्यांचे विषय व प्रश्न समजून घेत प्रशासनाला व केंद्र सरकारकडे ते मांडण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.त्यामुळे चालक काम करण्यासाठी तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 


२४ तासात पुरवठा सुरळीत होणार


जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,  इंधन पुरवठा आता सुरळीत सुरू होणार आहे. जसे शांतपणे संप पुकारला तसाच कामावरही शिस्तपणे हजर होवून काम सुरू करावे. इंधन पुरवठा सुरू झाला आहे.नागरिकांनी पॅनिक होवू नये. पुढील २४ तासात पुरवठा सुरळीत होईल. 


कार्यशाळेद्वारे चालकांचे गैरसमज दूर करणार


केंद्राचा अपघात विरोधी कायदा अन्याय कारक असल्याचे चालकांचे मत होते. त्यात काही गैरसमज होते. चालकांनी मांडलेल्या म्हणण्यावर एक कार्यशाळा घेण्यात येईल. त्यात कायद्याचा काय हेतू आहे हे सांगितले जाणार आहे. चालकांचे गैरसमज दूर करण्यात येतील. वाहन चालकांच्या समस्या केंद्र सरकारकडे आम्ही मांडणार आहोत. वाहन चालकांना थोडी असुरक्षितता वाटते. पोलीस प्रशासन त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे जिलाधिकारी शर्मा यांनी यावेळी सांगितले. 


कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घेणार


वाहतूकदार व वाहनचालकांना समजून सांगितले आहे. त्यांनी त्यांचे काम करण्यास मान्य केले आहे. वाहन चालकांना मार्गात काही त्रास होण्याची भीती आहे. मात्र, पोलिसांची महामार्गावर सर्वत्र पेट्रोलिंग सुरू आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटण्याचे काही कारण नाही. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील, कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी आम्ही दक्षता घेवू, असे नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी म्हटले आहे.