Sudhakar Badgujar: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ठाकरे गटाकडून काही दिवसांपूर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी (दि. 17) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) दणका दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात असणारी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना भाजपमध्ये समाविष्ट होणार आहे. भाजपचे वरीष्ठ नेते आदेश देतील, त्यानुसारच संघटनेचे कामकाज होणार असे स्पष्टीकरण सुधाकर बडगुजर यांनी दिले आहे. नाशिक महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सुधाकर बडगुजर हे अध्यक्ष आहेत. तर माजी मंत्री बबन घोलप हे या कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार?
सुधाकर बडगुजर यांच्या सोबत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना भाजपमध्ये समाविष्ट होणार असल्याने शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या संघटनेचे एकूण 2700 सभासद आहेत. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंगीकृत संघटनेचे 1200 सभासद आहेत. याच संघटनेच्या निवेदनाचे कारण पुढे करत सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये भेट घेतली होती. आता सुधाकर बडगुजर यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना भाजपमध्ये समाविष्ट करण्याची भूमिका घेतल्याने शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
सुधाकर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द 2007 साली सुरू झाली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि 2008 साली अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. 2009 ते 2012 या कालावधीत बडगुजर यांनी नाशिक महापालिकेचे सभागृहनेते म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर 2012 ते 2015 दरम्यान, ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवली. मात्र, दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
आणखी वाचा
