Sanjay Raut : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) घरात बाळासाहेब ठाकरेंचा नाही तर अमित शाह यांचा फोटो हवा. आता जे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून फिरत आहेत त्यांनी त्यांच्या देवघरात अमित शाह (Amit Shah) यांचा फोटो लावला पाहिजे. कारण त्यांचं दैवत अमित शाह आहेत. आमचा पक्ष आणि चिन्ह चोरण्याचं आणि आमचा पक्ष शिंदेंना देण्याचं काम अमित शाहांनी केलेलं आहे. मात्र, लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात. मग अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे अमृत पिऊन आलेले नाहीत, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय.
आज शनिवारी (दि.25) शिवसेना ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संजय राऊत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचेही आत्मचिंतन करण्यात आले. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही
संजय राऊत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर मी पहिल्यांदा आलो असलो तरी नाशिकचे पदाधिकारी मुंबईला येत असतात. आगामी महापालिका निवडणूकीसाठी आम्ही तयार आहोत सरकारने हिंमत दाखवली पाहिजे. आगामी निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या काळात फक्त नाशिकच नव्हे तर अनेक जिल्ह्यात बदल होतील. काही जण मोहासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. मात्र, ती खरी शिवसेना नाही. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, कुणीच राजकारणातून संपत नाही, असे त्यांनी म्हटले.
...तर आम्ही स्वबळाचा विचार करू
संजय राऊत म्हणाले की, मागच्या निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांना फक्त 16 जागा मिळाले होते आज ते सत्तेत आहेत. काही नगरसेवक गेलेत, यापुढे ज्यांना जायचं आहे त्यांची मनधरणी आम्ही करत बसलो नाही. शिवसेना अनेक संकटातून गेली आहे. स्वबळावर लढलो तर चांगली कामगिरी करू असे वाटले तर आम्ही स्वबळाचा विचार करू. आमचे नाशिकचे स्थानिक नेते स्वबळावर लढण्याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अमित शाह एकनाथ शिंदेंचं दैवत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यावरून संजय राऊत यांनी टोला लगावलाय. त्यांनी म्हटलंय की, आभार कुणाचे ईव्हीएमचे मानणार? त्यांनी दोन गोष्टीचे आभार मानले पाहिजे. काळा पैसा आणि ईव्हीएम मशीनचे. राज्यातील निकाल संशयास्पद आहे. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून पक्ष ताब्यात घेतले. बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी या लोकांनी आपल्या देवाऱ्यात अमित शाह यांचे फोटो लावले पाहिजे. कारण त्यांचं दैवत अमित शाह आहेत. आमचा पक्ष आणि चिन्ह चोरण्याचं आणि आमचा पक्ष शिंदेंना देण्याचं काम अमित शाहांनी केलेलं आहे. मात्र, लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात. मग अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे अमृत पिऊन आलेले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा