नाशिक: काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज असल्याचं सांगत, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदे घेतली. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी.जी.सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेवेळी उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने सुधाकर बडगुजर पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले. महानगर प्रमुख विलास शिंदे हे मात्र उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान पत्रकार परिषद सुरू असतानाच बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
काही महिन्यापूर्वी भाजप, शिंदे गटाने सलीम कुत्ता प्रकरण उकरून काढलं, बडगुजर यांच्यावर आरोप केले. ठाकरेंच्या पक्षाचे पदाधिकारी आणि सलीम कुत्ता याच्याशी संबंध जोडला, नको ते आरोप केले, आणि त्यांनी भेटायला वेळ मागितला, त्यांनी भेट घेतली, त्यानंतर सांगितलं चर्चेचा विषय हा महानगरपालिका कर्मचारी सेनेचा होता. काल त्यांना या पत्रकार परिषदेचा निरोप दिला होता. ते माझ्याशी बोलले असंही यावेळी त्यांनी सांगितलं. त्यांची व्यक्तीगत कामं आहेत. ते आता आमच्या पक्षात आहेत, असंही सूर्यवंशी म्हणाले. अनेक पक्ष आहेत कोण कुठेही जाऊ शकतं, असंही पुढे सूर्यवंशी म्हणाले.
दत्ता गायकवाड यांना चालू पत्रकार परिषदेत फोन
दरम्यान संजय राऊत यांचा माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन केला. पक्ष विरोधी कारवाई केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दत्ता गायकवाड यांनी माहिती देताना सांगितलं की, संजय राऊत यांचा फोन होता. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे सुधाकर बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे.
संजय राऊतांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुधाकर बडगुजरांना खडे बोल सुनावले
नाशिकमध्ये एखाद दुसरा नाराज असेल. लोकांना लाभ हवे आहेत त्यासाठी नाराजी असते. एकनाथ शिंदे सुद्धा आमच्यासोबत असताना नाराज होते आता महायुतीत सुद्धा नाराज आहे. अजित पवार कधीही नाराज दिसत नाहीत. ते कुठेही असो, अजित पवार नाराज नसतात. मी म्हणजे पक्ष नाही, संघटना म्हणजे पक्ष आहे. सुधाकर बडगुजर म्हणजे शिवसेना नाही, ते आमचे पदाधिकारी आहेत. भाजप आणि शिंदे गटाचा अजेंडा आहे पक्ष फोडायचे आहे, असंही माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं.