(Source: Poll of Polls)
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली अन्...; नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत आलिशान मर्सिडीज कारचा भीषण अपघात झालाय. यात नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू झालाय.

Samruddhi Mahamarg Accident: नुकतेच उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना समोर आली आहे. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नी व दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सुनील हेकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईहून नाशिककडे आलिशान मर्सिडीज गाडीतून प्रवास करत होते. मात्र, समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीने तीन वेळा पलटी मारली आणि सुनील हेकरे हे गाडीतून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही
तर मृत सुनील हेकरे यांचे बंधू अनिल हेकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघाताच्या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. "महामार्गावरील बांधकामाची गुणवत्ता निकृष्ट असून, अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
उद्घाटनाच्या महिन्याभरातच अपघातांची मालिका
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या 4 थ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा नवा मार्ग हा अपघाती मार्ग ठरतोय का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मागील आठवड्यातही भीषण अपघात
मागील आठवड्यात कसारा-शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होते. ही दुर्घटना वाशिंद आणि आमने दरम्यान घडली होती. अब्दुल पाशा शेख (65) आणि जाहीद सिद्दिकी (40) अशी मयत प्रवाशांचे नाव आहेत. अपघातग्रस्तांमध्ये दोन लहान मुले, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. समृद्धी महामार्गावरून एक कंटेनर मुंबई कडे जात होता. याच दरम्यान नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून भिवंडीकडे भरधाव वेगात निघालेल्या क्रूझर गाडीचा चालक मारुती गुंजाळ याचे गाडी वरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट पुढे चाललेल्या कंटेनरवर जाऊन धडकली होती.
आणखी वाचा
धक्कादायक! भाजप मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 कारमध्ये डिझेलऐवजी भरले पाणी; पेट्रोल पंपच सील



















