PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. सकाळी 10.30 वाजता त्याचे निलगिरी बाग येथे आगमन झाले. त्यानंतर नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. 


रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. पुरोहित संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नाशिककरांच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.  भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी यावेळी संकल्प करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. 


रामकुंडाचे असे आहे महात्म्य


राम कुंड हे गोदावरी नदीवरील एक महत्त्वाचे धार्मिक कुंड आहे. हिंदू धर्मीय या कुंडास अतिशय पवित्र जागा मानतात.हिंदु धर्मानुसार येथे जर स्नान केले तर माणसास पापमुक्ती प्राप्त होते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशातुन अमृताचे काही थेंब येथे पडले आणि राम कुंड पवित्र झाले अशी एक आख्यायिका आहे.


हिंदू धर्मीय येथे अस्थी विसर्जन करण्यासाठी येतात. येथे जर आपल्या पुर्वजांच्या अस्थीचे विसर्जन केले तर त्या अस्थी पाण्यात विरघळतात आणि मृतत्म्यास मोक्ष मिळतो असा समज हिंदु धर्मीयात आहे. दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा पार पाडतो. कुंभमेळ्याच्या वेळी लाखो हिंदू धर्मीय येथे जमतात आणि स्नान करून पुण्यप्राप्ती मिळवतात. यावेळी अनेक साधू संत उपस्थिती लावतात. 


मोदी नाशिककरांना गिफ्ट देणार का?


आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने मोदींचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. मोदी नाशिककरांना काही गिफ्ट देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जलपूजन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत.


23 मिनिटं पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात


पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर असून ऐतिहासिक काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. जवळपास 23 मिनिटं ते मंदिरात असणार असून विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. मोदी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश करतील आणि प्रथम हनुमानाचे दर्शन घेतील. त्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल, भावार्थ रामायणाचा पाठ केला जाईल आणि रामरक्षा पठण होईल, अशी माहिती महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे.