मुंबई : देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचं भविष्य ठरवणारी यंदाची नीट (NEET Exam) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून 3 मे रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा (Exam) रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आलंय. आता, या पेपरफुटीचे धागेदोरे समोर आले असून नाशिकमधून (Nashik) नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला, येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. 

NEET पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली. नाशिकमधील ही लीक प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, येथे फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले. त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, नीट परीक्षेसाठी काम करणाऱ्या संस्था आणि एजन्सीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान, नीट पेपर फुटीच्या प्रकरणाचा तपास आता देशातील सर्वात सक्षम तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयकडे देण्यात आला आहे. 

कोण आहे नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड? (NEET paper leak mastermind)

नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हाच पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचे दिसून येते. मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधी संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते.

सीबीआयमार्फत चौकशी (NEET Paper leak CBI investigte)

पेपरीफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून सीबीआयमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. देशभरात गेल्याच आठवड्यात म्हणजेच 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र 3 मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे. 

परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि चिंता

देशभरात 3 मे रोजी झालेली NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर मेहनत घेत तयारी केली होती. परीक्षा पार पडल्यावर अनेक विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत, तर काही जण पालकांसोबत विदेश दौऱ्यावरही गेले आहेत. मात्र, परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर आता पुढे काय होणार, पुन्हा परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. NEET परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातील विद्यार्थी विविध राज्यांतून मोठ्या शहरांमध्ये येऊन कोचिंग क्लासेस घेत असतात. 3 मे रोजी परीक्षा झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकत आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. काही विद्यार्थी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेले आहेत. मात्र परीक्षा रद्द झाल्याच्या बातमीमुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI