Chhagan Bhujbal : आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशी काही नावं पुढे केली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मला काही जास्त सांगता येणार नाही. पण शिवसेनेतून फुटून ज्यावेळी शिंदेसाहेब आणि बाकी लोक फुटले. या घटनेची स्क्रिप्ट दिल्लीतून तयार झाली आहे. त्यांच्याकडे अशाप्रकारचे व्यवस्थापन कौशल्य असल्याने या गोष्टी घडून आल्या आहेत. यावर महाराष्ट्रातील जनता काय म्हणते, हे बघावे लागेल, असे भुजबळ म्हणाले.
भुजबळ पुढे म्हणाले की, जनता ठरवेल कुठली शिवसेना खरी आहे. त्यासाठी निवडणुका आवश्यक आहेत. मला वाटतं की, समाजमाध्यमे यामुळे निशाणी आणि नावं सर्वदूर जातं. शेवटी संघटनेचा प्रमुख कोण आहे, हेच लोक लक्षात घेतात. यावर उदाहरण देताना भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी काँग्रेस देखील फुटली. तृणमूल काँग्रेस झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस नवा पक्ष उदयास आला. आता जनता ठरवेल कुणाला ठेवायचं आणि कुणाला नेस्तनाबुत करायचं? असा इशारा यावेळी भुजबळ यांनी दिला.
अमित शहा यांच्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, ते विरोधक आहेत, आरोप करणारच. पण त्यावेळी एकत्र बसून सगळ्यांनी निर्णय घेतला. आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशी काही नावं पुढे केली होती..पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यातील जे आमदार मंत्री होणार आहे, ते अनेकजण हे सिनिअर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना गळ घालण्यात आली. बाकी काही मला माहीत नाही.
मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेचे नाव...
यावेळी छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला ते म्हणाले की, अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्यात आले होते. पण सिनियर म्हणून ठाकरे यांना गळ घालण्यात आली. शिवाय पवारसाहेबांनी तसा आग्रह केला. म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.