Nashik TCS Case : नाशिक टीसीएस प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील MIM चे नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अजामीनपात्र वॉरंट काढल्याने मतीन पटेलवर कारवाई करण्यात आली आहे. TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका मतीन पटेलवर ठेवण्यात आला आहे.
निदा खानला मदत केल्याचा ठपका
निदा खानला मदत केल्या प्रकरणी मतीन पटेलची SIT कडून तीन वेळा चौकशी करण्यात आली आहे. नाशिक रोड न्यायालयाने NBW वॉरंट काढल्याने मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर न राहिल्याने मतीन पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. नाशिक पोलिसांकडून उद्या दुपारी मतीन पटेल ला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. TCS प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा मतीनवर आरोप असून त्यांच्या मोबाईल फोन मधील डेटा देखील SIT कडून चौकशी दरम्यान जप्त करण्यात आला आहे.
नाशिक TCS नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बीपीओ युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ, मानसिक व शारीरिक अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार मार्च 2026 मध्ये समोर आला. या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन एसआयटीमार्फत (SIT) तपास झाला असून काही आरोपींना अटक व नंतर जामीन मंजूर झाला आहे. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्रास देणे, लैंगिक शोषण करणे आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. काही संशयितांवर (मुख्य आरोपी निदा खानसह इतरांवर) कर्मचारांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा व दबाव आणल्याचा आरोप आहे. टीसीएसने दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण (POSH) कायद्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याचा अहवाल दिला आहे. पोलिसांनी गुन्हे नोंदवून तपास केला असून, मुख्य संशयित निदा खान व इतर काही जणांना न्यायालयाने अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांचं कंपनीनं निलंबन केलं गेलंय. तसंच, एका निवेदनाद्वारे कंपनीनं स्पष्टीकरण देत तपासात सहकार्य करत असल्याचं सांगितलंय. या प्रकरणी सर्वात पहिला गुन्हा दाखल झाला, त्यावेळी एफआयआरमध्ये पीडित महिलेनं अनेक गंभीर आरोप केले आहेत.