Nashik Sudhakar Badgujar :  कुंभमेळा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रविवारी नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले. सोमवारी त्यांचे पुतणे आणि माजी आमदार शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी होते. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) देखील सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या दोन्ही विवाहसोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आज नेत्यांची मांदियाळी दिसून आली. मात्र, संजय राऊत हे नाशिकमध्ये असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साईबाबा हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन समारंभाच्या वेळी ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले. संजय राऊत हे नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुधाकर बडगुजर?

मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिक्त पदे भरावी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्त्वाची बाब आहे. काही क्लास वन आणि क्लास टू, क्लास थ्री आणि क्लास फोरचे प्रमोशन बाकी आहे. ते प्रमोशन लवकर व्हावे, याबाबत निवेदन देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

संजय राऊत नाशिकमध्ये असताना तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबाबत विचारले असता सुधाकर बडगुजर म्हणाले की, साईबाबा हॉस्पिटलचे उद्घाटन आहे. त्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे आले होते. मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितली होती की, मला पाच मिनिटांची वेळ द्यावी. त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली.  त्या वेळेनुसार मी निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो. आमच्या मागण्याचे निवदेन मी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे.  मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार हे संजय राऊत यांच्यासह सर्वांना माहिती होतं, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

आणखी वाचा 

Sanjay Raut on Devendra Fadnavis : दत्तक नाशिकचं अनाथाश्रम करून टाकलं; राऊतांचा CM फडणवीसांवर हल्लाबोल; 'लाडकी बहीण'च्या वक्तव्यावर अजित पवारांचाही समाचार